Maharashtra: राज्यभरात वाहन परवान्याचे काम ठप्प; ‘सारथी’ संकेतस्थळ 'इतक्या' दिवस राहणार बंद

By अविनाश रावसाहेब ढगे | Published: May 16, 2024 04:48 PM2024-05-16T16:48:29+5:302024-05-16T16:49:11+5:30

राज्यभरातील प्रादेशिक परिवहन विभातील शिकाऊ आणि पक्का परवान्याचे काम ठप्प झाले आहे....

Vehicle licensing stopped across the state; The 'Sarathi' website will remain closed for 'so many' days | Maharashtra: राज्यभरात वाहन परवान्याचे काम ठप्प; ‘सारथी’ संकेतस्थळ 'इतक्या' दिवस राहणार बंद

Maharashtra: राज्यभरात वाहन परवान्याचे काम ठप्प; ‘सारथी’ संकेतस्थळ 'इतक्या' दिवस राहणार बंद

पिंपरी : परिवहन विभागाचे (आरटीओ) ‘सारथी’ संकेतस्थळ पुन्हा एकदा बंद पडले आहे. गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास अचानक संकेतस्थळ देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी १६ ते १८ मे पर्यंत बंद राहणार असल्याचा संदेश संकेतस्थळावर प्रसिद्ध  करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यभरातील प्रादेशिक परिवहन विभातील शिकाऊ आणि पक्का परवान्याचे काम ठप्प झाले आहे. 

नागरिकांच्या सोयीच्या दृष्टिकोनातून परिवहन विभागाने जास्तीत जास्त सेवा ऑनलाइन करण्यावर भर दिला आहे. त्यात अलीकडे आरटीओच्या काही सेवांबाबत आरटीओमध्ये न येता (फेसलेस) कामे करण्यावर भर दिला जात आहे. पण गेल्या काही दिवसांपासून संकेतस्थळाला येणाऱ्या तांत्रिक अडचणीमुळे नागरिक त्रस्त आहेत. गुरुवारी पून्हा एकदा दुपारी एकच्या सुमारास ‘सारथी’ संकेतस्थळ अचानक बंद पडले.

शनिवार (दि. १८) पर्यंत संकेतस्थळ देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी बंद राहणार असल्याचा संदेश संकेतस्थळावर देण्यात आला आहे. अचानक संकेतस्थळ बंद पडल्यामुळे राज्यभरातील आरटीओत गुरुवारी वाहन परवाना काढण्यासाठी, नुतनीकरणासाठी आलेलेल्या नागरिकांचा खोळंबा झाला. परवान्याचे काम न झाल्यामुळे अनेक जणांना रिकाम्या हातानी परतावे लागले. शिकाऊ वाहन परवान्यासाठी १६ ते १८ दरम्यानच्या काळात ज्या नागरिकांनी परवान्यासाठी अपॉइंटमेंट घेतलेली, त्यांनी नव्याने अपॉइंटमेंट घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

एक वर्षापासून संकेतस्थळ अप ॲन्ड डाउन-

मागील एक वर्षापासून आरटीओचे कधी ‘सारथी’ तर कधी ‘वाहन’ संकेतस्थळ बंद पडते. सुरु झाले तरी आठ ते दहा दिवसांनंतर पून्हा दिवसातून एक ते दोन वेळा सर्व्हर डाऊन होते. त्यामुळे ऑनलाइन अर्ज केल्यानंतर पेमेंट न होणे, नवीन शिकाऊ, पक्का वाहन परवाना  काढणे, कर्जाचा बोजा चढविणे-उतरविणे, परवाना नूतनीकरण, डुप्लिकेट परवाना आदी कामे ठप्प होतात. संकेतस्थळ कधी सुरू होणार, तांत्रिक अडचणी कधी दूर होणार याची माहिती नसल्यामुळे नागरिकांना विनाकारण आरटीओच्या फेऱ्या माराव्या लागतात. यामध्ये वेळ आणि पैसा वाया जातो. 

आरटीओ प्रशासनच अनभिज्ञ 

नॅशनल इन्फर्मेशन सेंटर (एनआयसी) मार्फत ‘सारथी’ संकेतस्थळाचा कारभार चालवला जातो. गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास  संकेतस्थळ बंद पडले. १६ ते १८ दरम्यान देखभाल दुरुस्तीसाठी संकेतस्थळ बंद राहणार असल्याचा संदेश प्रसिद्ध करण्यात आला.  संकेत स्थळ देखभाल दुरुस्तीसाठी तीन दिवस बंद राहणार असल्याची आरटीओला देखील माहिती दिली नसल्याने आरटीओ आणि एनआयसी यांच्यात समन्वय नसल्याचे दिसून येते. 

प्रशासनाचा बोलण्यास नकार 

परिवहन विभागाचे उपायुक्त (संगणक) संदेश चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता. त्यांनी संकेत स्थळावर माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. याबद्दल काहीच कल्पना नसल्याचे सांगितले. 

एनआयसीला संकेतस्थळ देखभाल दुरुस्तीचे काम करायचे असेल तर नागरिकांना  दोन दिवस अगोदर पूर्व कल्पना देणे आवश्यक आहे. पण, तसे न करता कधीही अचानक दुरुस्तीचे काम असल्याचे सांगून संकेतस्थळ बंद करतात.

- बबन मिसाळ, कार्याध्यक्ष, मोटर ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशन 

Web Title: Vehicle licensing stopped across the state; The 'Sarathi' website will remain closed for 'so many' days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.