विद्यापीठ आवारात विद्यार्थीनींसाठी आता वाहनव्यवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 03:07 PM2017-10-07T15:07:28+5:302017-10-07T15:13:20+5:30
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आवारात रात्रीच्यावेळी ये-जा करणाºया विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र वाहन व्यवस्था करण्यात आली आहे.
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आवारात रात्रीच्यावेळी ये-जा करणार्या विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र वाहन व्यवस्था करण्यात आली आहे. ही निशुल्क सेवा सायंकाळी साडे सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत मुख्य प्रवेशद्वारापासून मुलींच्या वसितगृहापर्यंत सुरू असणार आहे.
विद्यापीठ आवारामध्ये यापूर्वी अनेकदा सुरक्षिततेचे प्रश्न उभे राहिले आहेत. खून, हाणामारी, विद्यार्थिनींची छेडछाड असे प्रकार घडल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जातात. वाहनांच्या तोडफोडीच्या घटनाही घडल्या आहेत. तसेच विद्यार्थी संघटनांमधील वादावादी ही बाब तर नित्याचीच झाली आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या सुरक्षा विभागाकडून याबाबत सातत्याने गस्त घालून त्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. याचाच एक भाग म्हणून सुरक्षा विभागाने विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांना ये-जा करण्यासाठी वाहनव्यवस्था केली आहे. सर्व विद्यार्थिनींनी विद्यापीठ आवारात ये-जा करण्यासाठी या चारचाकी वाहनाचा वापर करावा, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाने केले आहे.
याविषयी माहिती देताना विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. अरविंद शाळीग्राम म्हणाले, विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्यादृष्टीने वाहन व्यवस्था करण्यात आली आहे. ही सेवा विद्यापीठाचे मुख्य प्रवेशद्वार ते मुलींचे वसितगृह या दरम्यान असेल. सायंकाळी साडे सहा वाजल्यानंतर रात्री साधरणपणे दहा वाजेपर्यंत याचा वापर करता येईल. सुरक्षा विभागाकडीलच हे वाहन आहे. ही सेवा सध्यातरी पूर्णपणे मोफत असणार आहे. वसतिगृहात राहणार्या विद्यार्थिनींची ये-जा यावेळेत असते. त्यामुळे प्रामुख्याने त्यांच्यासाठी ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यावेळेत इतर विद्यार्थिनींना ये-जा करण्यासाठीही हे वाहन वापरता येईल.