पैसे मागणाऱ्या लहान मुलांमुळे वाहनधारक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:09 AM2021-07-18T04:09:01+5:302021-07-18T04:09:01+5:30
खडकी : पुणे-मुंबई मार्गावर खडकी येथील सिग्नलवर पैसे मागणाऱ्या लहान मुलांमुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत. वारंवार असे प्रकार ...
खडकी : पुणे-मुंबई मार्गावर खडकी येथील सिग्नलवर पैसे मागणाऱ्या लहान मुलांमुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत. वारंवार असे प्रकार घडत असल्याचे यावर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
पुणे-मुंबई मार्गावर वाकडेवाडी, खडकी येथील अंडी उबवणी चौकात असाच प्रकार होतो. कोणतेही वाहन कोणत्याही सिग्नलला थांबले की,लगेच ही नग्न अवस्थेत असलेली मुले हातात मळकट कापड घेऊन सिग्नलवर सुसाट पळत सुटतात. दोन ते तीन मुले तीस सेकंदात वाहनचालकांकडून जास्तीत जास्त पैसे मागण्यासाठी चढाओढ करतात. त्यादरम्यान सिग्नल अचानक सुटला तर या मुलांना वाहन धडकून अपघात होण्याची शक्यता आहे. तसेच पैसे मागताना दुचाकीवरील महिला व पुरुषांना ही लहान मुले वेगवेगळ्या प्रकारे त्रास देतात. जर कोणी पैसे देत नसेल तर त्यांच्या हाताला पायाला कुठेही धरणे, महिलांची पर्स ओढणे, वाहनचालकांचे पाया पडणे, कपडे ओढणे असे प्रकार ही मुले वाहतूक पोलिसांसमोर करत असतात. तरीही पोलीस यांना हटकत नाहीत. तसेच या मुलांचे पालक ही सिग्नलवर इतर ठिकाणी खेळणी, पेन, इत्यादी विक्री करीत असतात. चौकाच्या शेजारीच एसीपी ग्राउंडवर झोपडी टाकून ते राहतात. यांच्यावर खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अतिक्रमण विभाग व घोले रोड क्षेत्रीय कार्यालयातील अतिक्रमण विभाग लक्ष देत नाहीत. या बेकायदेशीर झोपडी टाकून राहणाऱ्या लोकांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिक व वाहचालक करीत आहेत.
१७
रिक्षातील प्रवाशांकडून पैशाची मागणी करणारा मुलगा