वाहन नोंदणी पुन्हा झाली ‘स्मार्ट’, वाहनचालकांना स्मार्ट कार्ड देण्यास सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 04:18 AM2018-01-09T04:18:03+5:302018-01-09T04:18:15+5:30
मागील काही महिन्यांपासून करार संपल्याने बंद झालेले स्मार्ट कार्डच्या रूपातील नोंदणी प्रमाणपत्र (आरसी) पुन्हा सुरू करण्यात आले आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून सोमवारपासून नोंदणी होणाºया वाहनचालकांना स्मार्ट कार्ड देण्यास सुरुवात झाली आहे.
पुणे : मागील काही महिन्यांपासून करार संपल्याने बंद झालेले स्मार्ट कार्डच्या रूपातील नोंदणी प्रमाणपत्र (आरसी) पुन्हा सुरू करण्यात आले आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून सोमवारपासून नोंदणी होणाºया वाहनचालकांना स्मार्ट कार्ड देण्यास सुरुवात झाली आहे.
परिवहन विभागाने स्मार्ट कार्डसाठी खासगी कंपनीशी केलेला करार संपल्याने डिसेंबर २०१४ पासून आरसीचे स्मार्ट कार्ड देण्यास बंद करण्यात आले होते. तेव्हापासून पेपर आरसी देण्यात येत होती. त्यानंतर मागील वर्षी स्मार्ट कार्डसाठी पुन्हा कराराची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. पण काही कारणांमुळे या प्रक्रियेला विलंब झाला. संबंधित खासगी कंपनीला काही अटी मान्य नसल्याने ही प्रक्रिया लांबली होती. त्यामुळे परिवहन विभागाने काही अटींमध्ये बदल केल्याने कंपनीने पुन्हा स्मार्ट आरसी देण्यास सुरूवात केली आहे. यामध्ये विभागाकडून वाहनधारकांना या आरसी देण्यास विलंब होत होता. तसेच, मध्यंतरी आरसी छपाईसाठी लागणारा कागद उपलब्ध होत नव्हता. या सर्व कारणांमुळे काही महिन्यांपूर्वी प्रलंबित आरसीची संख्या एक लाखावर पोहोचली होती.
थेट आरटीओमधून आरसी वितरीत
स्मार्ट आरसीसाठी नागरिकांना दोनशे रुपयांचे शुल्क मोजावे लागणार आहे. आता थेट आरटीओमधून आरसी वितरीत करण्यात येणार असून, वाहनचालकांना कार्यालयात जाऊन आरसी घ्यावी लागणार आहे. ज्या वाहनधारकांकडे पेपर आरसी आहे, त्यांना स्मार्ट कार्ड आरसी काढायची असल्यास त्यांची नोंदणी प्रमाणपत्राची दुय्यम प्रत मिळण्यासाठी आॅनलाइन अर्ज व शुल्क भरावे लागणार आहे. मात्र, हे बंधनकारक असणार नाही, असे आरटीओकडून स्पष्ट करण्यात आले आहे.