डॉक्टराच्या वेशात येऊन तो करायचा वाहनचोऱ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 01:59 AM2019-02-28T01:59:20+5:302019-02-28T01:59:23+5:30
पुणे : डॉक्टरांना समाजात नेहमीच आदराचे स्थान असल्याने त्याचा गैरफायदा घेऊन पांढरा अॅप्रन घालून त्यावर नेमप्लेट लावत असे़ असा ...
पुणे : डॉक्टरांना समाजात नेहमीच आदराचे स्थान असल्याने त्याचा गैरफायदा घेऊन पांढरा अॅप्रन घालून त्यावर नेमप्लेट लावत असे़ असा पेहराव करून तो रेकी करायचा व त्यानंतर वाहने चोरून घेऊन जात असे़ सलग दीड ते दोन वर्षे त्याचा हा उद्योग सुरू होता़ फरासखाना पोलिसांनी त्याचा बुरखा फाडला असून, त्याच्याकडून ३० वाहने जप्त केली.
शाहरुख रज्जाक पठाण (वय २२, रा़ बुधाची वाडी, बनपुरी, ता़ पुरंदर) असे त्याचे नाव आहे़ शहरातील वाढत्या वाहनचोरीच्या घटना घडत असून, त्याचा शोध लागत नाही़ पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांनी या चोरट्यांचा शोध घेण्यासाठी सर्व पोलीस ठाण्यांना सूचना दिल्या होत्या़ यादरम्यान, फरासखाना पोलीस ठाण्याचे तपास पथकाचे उपनिरीक्षक महेंद्र पाटील व त्यांचे पथक पेट्रोलिंग करत होते. या वेळी कर्मचारी शंकर कुंभार यांना माहिती मिळाली की, शाहरुख पठाण हा दुचाकी चोऱ्या करत आहे. त्यानुसार, वरिष्ठ निरीक्षक किशोर नावंदे, उपनिरीक्षक पाटील, कर्मचारी अमेय रसाळ, केदार आढाव तसेच त्यांच्या पथकाने पठाणला सापळा रचून पकडले. चौकशी केली असता त्याने वाहने चोरल्याचे सांगितले. तपासात फरासखाना परिसरातील ८ गुन्ह्यांसह शहरातील विविध पोलीस ठाण्यांमधील वाहनचोरीचे २५ गुन्हे उघडकीस आणले आहेत. यात २६ दुचाकी, ३ चारचाकी तसेच एक टेम्पो असा २७ लाख २५ हजारांचा माल जप्त करण्यात आला आहे.
सासवड परिसरात अनेक वाहनांची विक्री
४पठाण याचे बारावीपर्यंत शिक्षण झाले आहे़ तो काही दिवस मेडिकलच्या दुकानात कामाला होता़ तो डॉक्टर घालतात तसा अॅप्रन घालत असे़ त्यावर बी़ जे़ मेडिकलचा एमबीबीएस डॉक्टर असल्याची बनावट नेमप्लेटही लावत़ डॉक्टरांना आवश्यक असणाºया वस्तू एका बॅगेत घेऊन तो फिरत असे़ कोणी अडविल्यास आपण डॉक्टर आहे, चोर नाही, असे सांगून निसटता येईल, असा त्याचा त्यामागे विचार होता़ सासवडहून तो भाड्याने मोटार घेऊन येत असे़ त्यानंतर शहरात फिरुन वाहने चोरुन ती मोठ्या वाहनातून ती दुसरीकडे घेऊन जाऊन विक्री करत असे़ त्याने सासवड परिसरात अनेकांना वाहने विकली आहेत. त्याच्याकडून वाहने घेतलेल्या व मदत करणाऱ्यांचा तपास सुरू आहे.