पिंपरीत वाहन चोरीचे सत्र सुरूच, चोरट्यांनी पळवल्या चार दुचाकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 12:49 PM2021-04-05T12:49:31+5:302021-04-05T12:50:05+5:30
पिंपरी, चिखली आणि सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल
पिंपरी: शहरात वाहन चोरीचे सत्र सुरूच आहेत. अज्ञात वाहनचोरट्यांनी शहरातून चार दुचाकी चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात दोन तर चिखली व सांगवी पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक गुन्हा शनिवारी दाखल केला आहे.
दुचाकी चोरीच्या पहिल्या गुन्ह्यात विकास अनंतराव बनसोडे (वय २३, रा. पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीने त्यांची ७० हजार रुपये किंमतीची दुचाकी २३ मार्च रोजी घराजवळ पार्क केली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी दुचाकी चोरीस गेल्याचे दिसून आले.
गणेश रामभाऊ राऊत (वय ३२, रा. पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राऊत यांनी त्यांची २५ हजार रुपये किंमतीची ही दुचाकी राहत्या घरासमोर २५ मार्च रोजी रात्री अकराच्या सुमारास पार्क केली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी आठच्या सुमारास दुचाकी चोरीस गेल्याचे दिसून आले.
धनराज नामदेव सोनवणे (वय ५६, रा. चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीने त्यांची ५० हजार रुपये किंमतीची दुचाकी राहत्या घरासमोरील मोकळ्या जागेत पार्क केली होती. शनिवारी दुपारी साडेचारच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दुचाकी दुचाकी चोरून नेली.
पिंटू नागोराव बदणे (वय ३४, रा. नवी सांगवी) यांनी शनिवारी याबाबत सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीने त्यांची दुचाकी राजीव गांधी पूल, सांगवी येथे रस्त्याच्या कडेला पार्क केली होती. चोरट्यांनी ती दुचाकी चोरून नेली. वाहन चोरीचा हा प्रकार २९ मार्च रोजी सायंकाळी साडेसात ते ३० मार्च रोजी सकाळी साडेनऊ या कालावधीत घडला.