वाहनचोरांनी दिले सिंहगड पोलिसांनाच आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 07:46 PM2019-11-27T19:46:48+5:302019-11-27T19:47:03+5:30
सिंहगड रस्ता पोलीस ठाणे हद्दीत वाहनचोरांचा धुमाकूळ
पुणे : सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहनचोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, गेल्या दहा दिवसांत सिंहगड रस्त्यावरील विविध भागातून वाहनचोरीच्या सहा घटना घडल्या आहेत. नºहे, धायरी, वडगाव या परिसरातून वाहनांची चोरी झाली आहे. वाढत्या वाहनचोरीमुळे परिसरातील नागरिक हवालदिल झाले आहेत.
गेल्या दहा दिवसांपासून सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहनचोरांनी धुमाकूळ घातला आहे. दहा दिवसांत सहा दुचाकी चोरट्यांनी गायब केल्या असल्याने एकप्रकारे वाहनचोरांनी पोलिसांनाच 'आव्हान' दिले आहे. दररोज अथवा एकदिवसाआड वाहनचोरी होत असल्याने नागरिकांसह पोलीसही हतबल झाले आहेत.
काही ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज मिळूनही पोलिसांनाच चोर मिळत नसल्याने परिसरात 'वाहनचोरी' चर्चेचा विषय बनला आहे. वाहनचोरी झाल्यानंतर नागरिक वाहनचोरीची तक्रार देण्यासाठी पोलीस चौकीत आल्यानंतर, तक्रारदारांनाच दोन दिवस वाहन शोधा, असे सांगून तक्रार घेण्याचे टाळले जाते, तसेच तुमच्या सोसायट्यांनी पार्किंगमध्ये सीसीटीव्ही बसविले नसल्याने, आता आम्ही वाहनचोरांना कसे शोधणार? अशी उत्तरे घटनेचे ‘गांभीर्य’ नसलेल्या पोलीस अधिकाºयांकडून नागरिकांना मिळत असल्याने काही नागरिकांनी तर वाहनचोरीची फिर्यादच दिली नसल्याचे समजते.
..............
नागरिकांनीही काळजी घेण्याची गरज
नºहे भागातील अभिनव कॉलेज परिसरात अनधिकृत बांधकाम मोठ्याप्रमाणात झाले आहे. स्वस्तात फ्लॅट मिळत असल्याने बºयाच नागरिकांनी या ठिकाणी फ्लॅट घेतले आहेत. मात्र, या परिसरात अनधिकृत बांधकाम जास्त असल्याने बिल्डिंगमधील नागरिकांनी एकत्र येऊन सोसायटी स्थापन करण्यास अडचण येत असल्याने त्या ठिकाणी सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून सोसायट्यांना सीसीटीव्ही अथवा सुरक्षारक्षक ठेवणे अशक्य होत असल्याने याचाच फायदा घेऊन वाहनचोर याच परिसरात जास्त चोरी करताना दिसत आहेत.
..........
वाढती वाहनचोरी लक्षात घेता रात्रीची गस्त वाढविली असून, जादा कर्मचारी व अधिकारी नेमले असून, त्याचबरोबर वाहनचोरांचा तपास सुरू आहे. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून नागरिकांनीही सोसायटीमध्ये सीसीटीव्ही लावणे गरजेचे आहे. - नंदकिशोर शेळके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सिंहगड रस्ता पोलीस ठाणे
.......
सोसायट्यांच्या पार्किंगमधून वाहनचोरी
नºहे येथील अभिनव कॉलेज रस्त्यावरील ओम पर्ल सोसायटीत राहणाºया अमोल कदम या नागरिकाने १० नोव्हेंबर रोजी स्वत:ची दुचाकी सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावली होती, मात्र दुसºया दिवशी पार्किंगमध्ये पाहिले असता दुचाकी नसल्याचे लक्षात आल्याने त्यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार दिली.
.....
परंतु, आता पार्किंगमधूनच जर चोरटे दुचाकी चोरत असतील, तर आम्ही नागरिकांनी दुचाकी काय घरात नेऊन पार्क करावी का, असा संतप्त सवाल अमोल कदम यांनी केला.
,...........४
रात्रीची गस्त वाढविण्याची गरज
सिंहगड रस्त्यावरील वाढती लोकवस्ती, तसेच दिवसेंदिवस वाढती गुन्हेगारी लक्षात घेता सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याकडून परिसरात रात्रीची गस्त वाढविण्याशिवाय पर्याय नाही. मात्र, 'रात्रीची गस्त' फक्त नावापुरती न वाढविता वाहनचोरीला आळा बसवून त्याचबरोबर वाहनचोरांना ताब्यात घेणेही गरजेचे असल्याचे मत परिसरातील नागरिकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.