'पेव्हिंग ड्रायव्हिंग' करणाऱ्यांची मुजाेरी ; पादचाऱ्यांची डाेकेदुखी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2018 07:48 PM2018-11-21T19:48:00+5:302018-11-21T19:50:24+5:30

वाहतूकीचे नियम धाब्यावर बसवत बिनधास्तपणे फुटपाथवरुन वाहने हाकणा-यांमुळे नागरिकांची डोकेदुखी वाढत आहे. यामुळे फुटपाथ चालण्याकरिता आहेत की गाडी चालविण्याकरिता असा प्रश्न नागरिकांसमोर उभा राहिला आहे.

vehicles on footpath ; camuters are facing problems | 'पेव्हिंग ड्रायव्हिंग' करणाऱ्यांची मुजाेरी ; पादचाऱ्यांची डाेकेदुखी

'पेव्हिंग ड्रायव्हिंग' करणाऱ्यांची मुजाेरी ; पादचाऱ्यांची डाेकेदुखी

googlenewsNext

पुणे : वाहतूकीचे नियम धाब्यावर बसवत बिनधास्तपणे फुटपाथवरुन वाहने हाकणा-यांमुळे नागरिकांची डोकेदुखी वाढत आहे. यामुळे फुटपाथ चालण्याकरिता आहेत की गाडी चालविण्याकरिता असा प्रश्न नागरिकांसमोर उभा राहिला आहे. विशेष म्हणजे अशा 'पेव्हिंग ड्रायव्हिंग' करणा-यांची मुजोरगिरीवर वाहतूक पोलीस प्रशासन मात्र कारवाई करत नसल्याचे दिसून आले आहे.

 
    स्मार्ट सिटी अंतर्गत शहरातील विविध भागात रस्ता बांधणी, फुटपाथ निर्मिती, त्यावर आकर्षक सजावट करण्यात आली. नागरिकांना चालण्यास कुठल्याही प्रकारचा अडथळा येवू नये याकरिता प्रशस्त फुटपाथ तयार करण्यात आले आहेत. परंतु त्या फुटपाथवरुनच वाहनचालक वाहने चालवत असल्याने नागरिकांना चालणे अवघड होवून बसले आहे. शहरात जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन रस्ता यावर वाहनचालक उद्दामपणे फुटपाथवरुन वाहने चालवत असल्याचे दिसून आले आहे. नव्याने तयार करण्यात आलेल्या या फुटपाथवर अनेकांनी आपली खाद्यपदार्थांची दुकाने थाटल्याने  फुटपाथाची जागा आणखी कमी केली आहे. यामुळे अगोदरच वाहतूक कोंडीच्या प्रश्नाने हैराण केलेल्या पुणेकरांना फुटपाथवरुन देखील चालण्यास वाहनचालकांच्या अरेरावीला सामोरे जावे लागत आहे. 


     उपनगरांमध्ये देखील याप्रकारचे चित्र पाहवयास मिळत आहे. विशेषत: सायंकाळी कोरेगाव पार्कमध्ये वाहतूक कोंडी झाल्यानंतर वाहनचालक फुटपाथवरुन बिनधास्तपणे वाहन चालवत आहेत. अशावेळी त्या फुटपाथवरुन चालणा-या नागरिकांना वाहतूक कोंडी बरोबरच फुटपाथवरील वाहनचालकांच्या बेशिस्तपणाला तोंड द्यावे लागत आहे. 



- पदपथावर होणा-या बेकायदेशीर पार्किंगमुळे आणि पदपथावरून जाणा-या गाड्यांमुळे खूप वेळ थांबावे लागते. यामुळे महाविद्यालयात वेळेत पोहचण्यास अनेकदा उशीर होतो. वाहनचालकांसोबत वाद होतात,पदपथावरून  बेकायदेशीर चालवल्या जाणा-या गाड्यांमुळे पदपथाची दुरवस्था झाली आहे. - तृप्ती फावडे, विद्यार्थिनी, गरवारे महाविद्यालय
  

- फुटपाथवर बेकायदेशीरपणे वाहने पार्किंग  केल्यामुळे कधी कधी चालण्यासाठी जागा मिळत नाही. तेव्हा  रस्त्यावरून चालावे लागते.  अशावेळी अपघात होण्याची भीती वाटते. सायकल पार्किंगकरिता जागा मिळत नाही. - समाधान बोराडे 

 - मुख्यत: एफ.सी.रस्त्याला अनुसरून फुटपाथची आकार वाढला आहे. तसेच रहदारी वाढल्याने पायी चालणा-यांना त्रासाला सामोरे जावे लागते.  साधारणत: १०% वाहने फुटपाथवरून जातात. याचा सामान्य नागरिक व विद्यार्थी यांना मुख्यत: जास्त सामना करावा लागतो.त्यामुळे अधिक चिडचिडेपणा वाढतो. - कोमल कोळपे विद्याथीर्नी, मॉडर्न महाविद्यालय 

- सायकल चालवत असताना स्कुटरवाले बर्याचदा सायकलचाच मार्ग वापरतात. त्यामुळे सायकल चालवावी की नाही अस वाटायला लागते.  सायकलींचे भवितव्य असुरक्षित वाटायला लागले आहे. त्याचबरोबर एखादी स्कुटर,सायकल मार्गावर आली तर तिला रस्त्यावरून खाली उतरण्यासाठी जागा मिळत नसल्यामुळे गाडीवालेही सायकलचाच मार्ग वापरतात. -  श्रीकृष्ण कानेटकर,  नागरिक 


- वाहतुकीचे नियम पाळण्याची लोकांची मानसिकता तयार होणं खूप गरजेचं आहे.पदपथावरून चालत असतांना बर्याचदा गाड्यांमुळे तारेवरची कसरत करावी लागते.अशावेळी हा मार्ग पादचायार्साठी की गाड्यांसाठी असा प्रश्न पडतो.याची तक्रार आम्ही करायची तरी कुणाकडे. - समिक्षा आव्हाळे, विद्यार्थीनी 

- फुटपाथवरुन  गाड्या जातात तेव्हा आम्ही त्यांना पेव्हर ड्रायव्हींग या नियमानुसार २०० रुपये  दंड आणि पार्किंग केल्यास १००० रू. दंड लावतो. लोकांना पथावरून चालता यावे याकरिता काळजी घेतो . - प्रमोद कोकणे,  पोलिस कर्मचारी वाहतूक शाखा

Web Title: vehicles on footpath ; camuters are facing problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.