रवींद्र बऱ्हाटेची वाहने, मोबाईल पोलिसांच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:10 AM2021-07-17T04:10:01+5:302021-07-17T04:10:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : खंडणी, जमीन बळकावणे प्रकरणातील आरोपी रवींद्र बऱ्हाटे अटक टाळण्यासाठी फरार झालेला असताना त्याला ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : खंडणी, जमीन बळकावणे प्रकरणातील आरोपी रवींद्र बऱ्हाटे अटक टाळण्यासाठी फरार झालेला असताना त्याला आळंदीतील एका व्यक्तीने त्याच्या घरी आश्रय दिला होता. त्या काळात बऱ्हाटेने वापरलेली तीन वाहने आणि मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहेत. तीन सीमकार्ड आणि एक फोनदेखील पोलिसांनी त्याच्याकडून हस्तगत केला आहे. याशिवाय फेसबुकवर टाकलेल्या क्लीप बऱ्हाटेने स्वत: तयार केल्या होत्या. त्या सर्व ठिकाणांचा पोलिसांनी पंचनामा केल्याची माहिती या प्रकरणातील विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी शुक्रवारी (दि.१६) न्यायालयास दिली.
गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी न्यायालयाने बऱ्हाटेच्या पोलीस कोठडीत २० जुलैपर्यंत वाढ केली आहे. विशेष मोक्का न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी हा आदेश दिला. सागर म्हस्के असे बऱ्हाटेला आश्रय देणाऱ्याचे नाव आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. फरार असताना बऱ्हाटेने वापरलेल्या दोन दुचाकी आणि एक चारचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. त्यातील कार बऱ्हाटेची पत्नी संगीता हिच्या नावावर आहे. तर एक दुचाकी या प्रकरणातील फिर्यादीचा विश्वासघात करून ताब्यात घेतली आहे.
पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने शुक्रवारी बऱ्हाटेला न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या रिमांड रिपोर्टमध्ये या बाबी नमूद आहेत. म्हस्केचा शोध घेण्यासाठी, या गुन्ह्यातील सह आरोपी विशाल ढेरे याच्याकडून या गुन्ह्यात सहभागी होण्यासाठी बऱ्हाटेने किती मोबदला घेतला याचा तपास करण्यासाठी, अटक टाळण्यासाठी बऱ्हाटेला आणखी कोणी मदत केली, त्याला अन्न, वस्त्र, निवारा, पैसे, औषधे, वैद्यकीय उपचार, प्रवासाची साधने आदी मदत कोणी केली या तपासासाठी बऱ्हाटेच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी अॅड. चव्हाण यांनी केली. गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस आयुक्त सुरेंद्र देशमुख करीत आहेत.