वाहनांची नोंदणी आता ‘शोरूम’मध्येच होणार, आरटीओमधला क्रमांकसाठीचा वशिला संपणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:08 AM2021-06-11T04:08:25+5:302021-06-11T04:08:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : दुचाकी व चारचाकी नव्या वाहनांची नोंदणी आता संबंधित वाहनविक्रेत्यांकडे (शोरूम चालक) होणार आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : दुचाकी व चारचाकी नव्या वाहनांची नोंदणी आता संबंधित वाहनविक्रेत्यांकडे (शोरूम चालक) होणार आहे. आरटीओकडे वाहनाची नोंदणी होणार नाही. राज्याच्या परिवहन विभागाने (आरटीओ) तसा निर्णय घेतला असून, येत्या चार ते पाच दिवसांत त्याची अंमलबजावणी होणार आहे. यामुळे वाहनांच्या क्रमांकासाठी ‘आरटीओ’तला वशिला संपणार आहे. ‘व्हीआयपी’ क्रमांक वगळता उर्वरित क्रमांक ‘ऑटोजनरेट’ पद्धतीने मिळतील. यात कुणाचा हस्तक्षेप असणार नाही.
राज्याच्या परिवहन विभागाने याच्या अंमलबजावणीचे आदेश राज्यातील सर्व प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना दिले आहेत. परिवहनेतर वाहन सर्वांगातील म्हणजे ‘नॉन ट्रान्सपोर्ट’ वाहनाची नोंदणी वाहन घेताना शोरूममध्येच केली जाणार आहे. यासाठी राष्ट्रीय सूचना केंद्राने आपल्या वाहन प्रणालीत आवश्यक ते बदलदेखील केला आहे. नोंदणी करताना वाहनाच्या चेसीचा क्रमांक, वाहनाचा फोटोसह आवश्यक ती कागदपत्रे ऑनलाइन सबमिट करावी लागणार आहे. हे सर्व काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. लवकरच याची अंमलबजावणीस सुरुवात होईल.
चौकट
व्हीआयपी क्रमांक केवळ ‘आरटीओ’कडेच
व्हीआयपी क्रमांक किंवा चॉइस क्रमांकच्या विक्रीतून आरटीओला कोट्यवधी रुपयांचे उत्पन मिळते. त्यामुळे आरटीओ प्रशासनाने केवळ व्हीआयपी क्रमांकचे अधिकार आपल्याकडे ठेवले आहे. सामान्य क्रमांक ऑटोमॅटिक पद्धतीने वाहनचालकांना मिळणार आहे.
चौकट
शोरूममध्येच वाहनांची नोंदणी झाल्याने वाहनधारकांच्या वेळेत बचत होणार आहे. त्यांना आरटीओ कार्यालयात जावे लागणार नाही. केवळ व्हीआयपी क्रमांक नोंदणी आरटीओकडे होईल.
-डॉ. अविनाश ढाकणे, परिवहन आयुक्त, मुंबई