नळकोंडाळ्यांवर विक्रेत्यांची दादागिरी
By Admin | Published: March 31, 2017 02:15 AM2017-03-31T02:15:14+5:302017-03-31T02:15:14+5:30
सार्वजनिक नळ कोंडाळ्यावर चायनीज व खाद्यपदार्थ विक्री करणारे दादागिरी करीत असल्याचे चित्र
बारामती : सार्वजनिक नळ कोंडाळ्यावर चायनीज व खाद्यपदार्थ विक्री करणारे दादागिरी करीत असल्याचे चित्र बारामती शहरात आहे. नगरपालिकेने खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना प्रतिबॅरल ३० रुपयांप्रमाणे शुल्क ठरवून दिले आहे. मात्र या प्रकारावर कोणतेही नियंत्रण नसल्याने खाद्यपदार्थ विक्रेते नगरपालिकेचे पाणी फुकटच वापरत आहेत.
सध्या उन्हाची तीव्रता वाढत आहे. त्यामुळे साहजिकच पाण्यासाठी सार्वजनिक नळ कोंडाळ्यांवर शहरामध्ये गर्दी दिसते. तीन हत्ती चौकातील नीरा कॅलन सोसायटीच्या लगत असणाऱ्या नळ कोंडाळ्यावर परिसरातील रहिवासी पाणी भरण्यासाठी येत असतात. मात्र तीन हत्ती चौक, भिगवण चौक, पूनावाला गार्डन येथील खाद्यपदार्थ, चायनीज विक्रेते मोठ-मोठे बॅरल घेऊन रांगा लावतात. त्यामुळे परिसरातील नागरिकांना पाणी भरण्यासाठी तासन्तास ताटकळत उभे रहावे लागते.
(प्रतिनिधी)
नगरपालिकेचे कर्मचारी शुल्क वसूल करत नाहीत
बारामती नगरपालिकेने खाद्यपदार्थ विक्रेत्यांना प्रतिबॅरल ३० रु. असा दर ठरवून दिला आहे. मात्र नगरपालिकेचा कोणताही कर्मचारी त्याची वसूल करताना दिसत नाही. तसेच विक्रेतेदेखील सार्वजनिक नळकोंडाळ्यावर गर्दी करून फुकटच पाणी भरतात. त्यामुळे नगरपालिकेचेही आर्थिक नुकसान होत आहे. तातडीने या विक्रेत्यांवर कारवाई करावी. तसेच विक्रेत्यांना पाण्याची वेगळी सोय नगरपालिकेने करून द्यावी. त्यामुळे सार्वजनिक नळकोंडाळ्यांवरची गर्दी कमी होईल, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. याबाबत मुख्याधिकारी नीलेश देशमुख यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.