वेंगसरकर, पीडीसीए विजयी
By admin | Published: May 11, 2017 04:34 AM2017-05-11T04:34:37+5:302017-05-11T04:34:37+5:30
यजमान पीसीएमसीज् व्हेरॉक वेंगरसरकर अॅकॅडमी आणि पुणे जिल्हा क्रिकेट संघटनेने (पीडीसीए) संघाने १३ वर्षांखालील
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : यजमान पीसीएमसीज् व्हेरॉक वेंगरसरकर अॅकॅडमी आणि पुणे जिल्हा क्रिकेट संघटनेने (पीडीसीए) संघाने १३ वर्षांखालील व्हेरॉक चषक क्रिकेट स्पर्धेत सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली.
वेंगसरकर अॅकॅडमीने सोलापूरच्या पुष्प अॅकॅडमीवर १२० धावांनी दणदणीत विजय मिळविला. त्यांचा तनिष्क सितापुरे सामनावीर ठरला. दुसऱ्या सामन्यात पीडीसीएने प्राधिकरण जिमखाना संघावर ४१ धावांनी सहज मात केली. आकाश निमक सामनावीर ठरला.
प्रथम फलंदाजी करताना सितापुरेच्या ६५ धावांमुळे वेंगसरकर अॅकॅडमीने २५ षटकांत ३ बाद १९३ अशी भक्कम मजल मारली. सितापुरेला तिलक जाधव (५६) आणि विराज काकडे (नाबाद ३३) यांनी सुरेख साथ दिली. पुष्प अॅॅकॅडमीच्या हरजस कोहलीने दोन बळी घेतले. पुष्प अॅकॅडमीला २९.४ षटकांत ७३ धावांपर्यंतच मजल मारता आली. त्यांच्या एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या उभारता आली नाही. अवांतर ३१ धावा सर्वाधिक ठरल्या. वेंगसरकरच्या सितापुरेने अष्टपैलू कामगिरी करताना ६ धावांत दोन बळी घेतले. त्यांच्या दुसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पीडीसीएने ४ बाद १४० धावा केल्या. त्यांच्या आकाश निमकने नाबाद ५८ आणि वरुण चौधरीने ३१ धावा केल्या. प्राधिकरण जिमखान्याच्या कमल शर्माने दोन गडी बाद केले. प्राधिकरणला ८ बाद ९९ धावा करता आल्या. त्यांच्या आर्यन परदेशीने २५ धावा केल्या. पीडीसीएच्या वरुण चौधरीने दोन गडी बाद केले.
स्पर्धेच्या पहिल्या दिवशी मंगळवारी सकाळच्या सत्रातील उद्घाटनाच्या सामन्यात यजमान व्हेरॉक वेंगसरकर अॅकॅडमीने क्रिकेट मास्टर्स अॅकॅडमीवर ७१ धावांनी मात केली. व्हेरॉकचा तनिष्क तनपुरे (५४ धावा) सामनावीर ठरला. दुसऱ्या सामन्यात पुणे जिल्हा क्रिकेट संघटना संघाने पीवायसी जिमखान्यावर १३ धावांनी चुरशीचा विजय मिळविला. २४ धावांत चार बळी घेणारा वरुण चौधरी सामनावीर ठरला. पीसीएमसीज् व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अॅकॅडमी आयोजित १३ वर्षांखालील मुलांच्या व्हेरॉक चषक क्रिकेट स्पर्धेस थेरगाव येथील मैदानावर मंगळवारी सुरुवात झाली. स्पर्धेचे उद्घाटन नगरसेवक अभिषेक बारणे यांच्या हस्ते पार पडले. या प्रसंगी अकादमीचे सर्व प्रशिक्षक उपस्थित होते.