कोव्हीडंच्या गंभीर रुग्णांसाठी व्हेंटिलेटर 'व्हेन सर्किट' प्रणाली जीवनदायिनी: बारामतीच्या डॉक्टरांचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2021 03:37 PM2021-05-02T15:37:57+5:302021-05-02T15:38:05+5:30
गंभीर कोव्हीडं रुग्णांसाठी महत्वाचा शोध
बारामती: बारामती शहरातील डॉक्टरांनी वैद्यकीय क्षेत्रातील एका प्रणालीचा वापर करत व्हेंटीलेटरची गरज भासणाऱ्या कोव्हीडं रुग्णासाठी महत्वाचा प्रयोग यशस्वी केला आहे. त्यामुळे वेळेवर व्हेंटीलेटर न मिळालेल्या रुग्णाला हि प्रणाली जीवदान देण्यासाठी महत्वाची भुमिका बजावणार आहे. यामुळे व्हेंटीलेटर अभावी जीव गमावण्याची वेळ रुग्णांवर येणार नसल्याचा दावा करण्यात आला आहे. ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर आणि सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.सदानंद काळे यांनी याबाबत अधिक माहिती दिली.
डॉ काळे म्हणाले, सध्याच्या काळात रुग्णसंख्या वाढत आहे. व्हेंटीलेटर आणि ऑक्सिजन बेडची कमतरता भासू लागली आहे. त्याच पार्श्वभूमीवर कोरोना रुग्णांना दिलासा देणारी एक प्रणाली तयार करण्यात आली आहे. या प्रणालीचा अवलंब करुन रुग्णाचे ‘ऑक्सिजन सॅच्युरेशन’चांगले ठेवणे शक्य आहे. व्हेंंटीलेटर ‘व्हेन सर्कि ट ’ असे या प्रणालीचे नाव आहे.
सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात दाखल असलेलल्या रुग्णावर त्याचा वापर केल्यावर असे लक्षात आले कि, संबंधित रुग्णाची ऑक्सिजन पातळी ९८ ते १०० पर्यंत अवघ्या एक ते दिड मिनिटात गेली. भुलप्रक्रियेसाठी या प्रणालीचा वापर केला जातो. मध्यंतरी याचा वापर बंद करण्यात आला होता. कोरोनाच्या काळात हीच प्रयोग यशस्वी ठरला आहे.
सध्याच्या काळात याची गरज आहे. ऑक्सिजन बेड वरच या पर्यायाचा अवलंब शक्य आहे. रुग्णाला व्हेंटीलेटर मिळेपर्यंत प्रणाली आधार देण्याचे काम करते. कार्डीयाक अॅम्ब्युलन्स’ मध्ये याचा वापर होतो, असे डॉ काळे यांनी सांगितले.
गुजर म्हणाले, बारामती शहारत डॉ.राहुल जाधव आणि डॉ सुजित अडसुळ यांनी या प्रणालीचा वापर सुरु करत व्हेंटीलेटरला तात्पुरता पर्याय शोधला आहे. डॉ.जाधव यांनी बारामती शहरातील त्यांच्या रुग्णालयात या पर्यायाचा अवलंब करत कोव्हीडं रुग्णांवर उपचार केला. तुलनात्मक दृष्ट्या दोन रुग्णांवर या प्रणालीचा प्रयोग करण्यात आला. यामध्ये एका रुग्णाला व्हेंटीलेटर लावण्यात आला, तर दुसऱ्या रुग्णाला या प्रणालीचा वापर करण्यात आला. काही वेळानंतर दुसरा रुग्णामध्ये व्हेंटीलेटर शिवाय ऑक्सिजन पातळीत वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले.
याबाबत 'लोकमत' शी बोलताना डॉ राहुल जाधव म्हणाले, वास्तविक भूलप्रक्रियेत रुग्णाला भूलवायू देण्यासाठी हि प्रणाली वापरली जाते. यामध्ये एक रिजर्व्हायर बॅग आणि लॉन्ग कंडक्टिग ट्यूब असते. बॅग मुळे ऑक्सिजन पुरवठा होतो. तर ट्यूब मुळे 'ऑक्सिजन सॅच्यूरेशन' 'मेन्टेन' होते. कोविड रुग्ण ज्या वेळी श्वास घेतो आणि सोडतो त्यावेळी हि प्रणाली कार्यान्वित राहते. शुद्धीवर असणाऱ्या कोव्हीडं रुग्णासाठी व्हेंटिलेटर मिळेपर्यंत हि प्रणाली महत्वाचे काम करू शकते.