पासपोर्टसाठी व्हेरिफिकेशन ७ दिवसांत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 05:06 AM2018-04-02T05:06:36+5:302018-04-02T05:06:36+5:30
पासपोर्टसाठी आणि पोस्ट खाते यांच्यात आहे तसा समन्वय पोलीस आणि पासपोर्ट खात्यात दिसत नाही. त्यामुळे पोलीस पडताळणीस विलंब होतो. तेलंगणा व आंध्रप्रदेश या राज्यांत ३ ते ४ दिवसांत पोलीस पडताळणी होते. आपल्याकडे २० दिवस लागतात.
पुणे - पासपोर्टसाठी आणि पोस्ट खाते यांच्यात आहे तसा समन्वय पोलीस आणि पासपोर्ट खात्यात दिसत नाही. त्यामुळे पोलीस पडताळणीस विलंब होतो. तेलंगणा व आंध्रप्रदेश या राज्यांत ३ ते ४ दिवसांत पोलीस पडताळणी होते. आपल्याकडे २० दिवस लागतात. यापुढील काळात तंत्रज्ञानाची मदत घेऊन आणि कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत वाढ करुन ती पडताळणी ५ ते ७ दिवसांत करण्यासाठी प्रयत्नशील आहोत, अशी माहिती भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी रविवारी दिली.
विदिशा विचार मंचाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात ‘भारताचे पासपोर्ट धोरण : परकीय चलनाचा राजमार्ग’ यावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पासपोर्ट प्रक्रियेसंदर्भातील बदलांविषयी मुळे म्हणाले, पासपोर्र्ट मिळ्ण्यात मोठी अडचण ही पोलीस पडताळणीची आहे. तेलंगणा व आंध्रप्रदेश महाराष्ट्राच्या तुलनेने कितीतरी पुढे आहेत. नगरमध्ये नुकतेच १८० वे पासपोर्ट कार्यालय सुरु करण्यात आले. एप्रिल अखेर देशात २५१ कार्यालये सुरु होणार आहेत. भविष्यात पासपोर्ट कार्यालयात न जाता घरी पासपोर्ट मिळेल अशा तंत्रज्ञानाचा विचार करण्यात येणार आहे. अजूनही १२५ कोटींपैकी केवळ ५ ते ६ कोटी लोकांकडे पासपोर्ट आहे. हे प्रमाण केवळ ५ टक्के आहे.
प्रत्येक जिल्ह्यात पासपोर्ट कार्यालय यावर विशेष लक्ष देणार असल्याचे मुळे यांनी सांगितले.
निवृत्तीनंतर डॉ. मुळे राजकारणात?
डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्या पुस्तक प्रकाशन समारंभाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित होते. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. नोव्हेंबरमध्ये डॉ. मुळे निवृत्त होत असून, निवृत्तीनंतर ते राजकारणात उतरणार असल्याची चर्चा आहे. याविषयी विचारले असता, डॉ. मुळे म्हणाले की, सध्या तरी मी सरकारी नोकरीत आहे. समाजातील चांगल्या क्षेत्रातील लोकांनी राजकारणात यायला हवे. याचा अर्थ, मी राजकारणात उतरणार नाही, असे नाही.