व्हर्टिकल गार्डन : आकर्षक ,नाविन्यपूर्ण तंत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:09 AM2021-07-24T04:09:38+5:302021-07-24T04:09:38+5:30
व्हर्टीकल फार्मिंग म्हणजेच उभ्या मांडण्यांमध्ये किंवा शेल्फमध्ये विविधप्रकारचे ट्रे व कुंड्या वापरुन त्यात सुपिक माती अथवा इतर माध्यमे वापरुन(कोकोपिट, ...
व्हर्टीकल फार्मिंग म्हणजेच उभ्या मांडण्यांमध्ये किंवा शेल्फमध्ये विविधप्रकारचे ट्रे व कुंड्या वापरुन त्यात सुपिक माती अथवा इतर माध्यमे वापरुन(कोकोपिट, राईसब्रान, हायड्रोप्रनिक्स वगैरे) वापरुन त्यात सुर्यप्रकाश किंवा कृत्रिम प्रकाश, वायु, पाणी, तापमान, आर्द्रता आणि विद्रव्य खते (आवश्यक अन्नद्रव्ये) यांचा नियंत्रित वापर करुन याची निर्मिती होते. गेल्या दोन दशकांत इमारतीच्या रचनेत ग्रीन वॉल समाविष्ट करण्यामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. लोकसंख्येची झपाट्याने वाढ आणि मोठ्या प्रमाणात नागरीकरणामुळे अन्नाची गरज वाढली आणि यामुळे अनुलंब शेतीचा विकास झाला. या तंत्राचा वापर आता अनेक आस्थापनांमध्ये , हॉटेल्स , मॉल्स , रिसॉर्ट्स , हॉस्पिटल्स , औदयोगिक क्षेत्रात देखील होत असून तो आता अनेकांच्या पसंतीला देखील पडत आहे. या मुळे जागेची बचत होऊन ती अधिक आकर्षक दिसते तसेच झाडांच्या नैसर्गिक रंगांमुळे कामाच्या ठिकाणी उत्साह आणि चैतन्यदायी वातावरण वाटते.
व्हर्टिकल गार्डनिंगचे फायदे :
व्हर्टीकल फार्मिंगचा एक फायदा म्हणजे हे तंत्र अवलंबल्यास यामुळे नैसर्गिक साधनसंपत्तीची बचत होईल. तसेच ग्रीन झोन किंवा अधिकाधिक हिरवळ निर्माण करण्यासाठी मदत होईल
उभ्यामांडणीसाठी स्टैंड:
फुलझाडांची निवड केल्यानंतर उपलब्ध जागेचा पुरेपूर वापर करता यावा यासाठी योग्य नियोजन अत्यंत गरजेचे आहे. रोपं कशापद्धतीने लावायची हे निश्चित झाल्यानंतर स्टैंड ची मांडणी कशी करता येईल याचा योग्य विचार करून आराखडा निश्चित करावा. असे करताना रोपांना वाढीसाठी कोणताही अडथळा होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच प्रत्येक स्टँड मधील रोपाला योग्य पाणी. योग्य प्रकाश कसा मिळेल याकडे लक्ष द्यावे.
हायड्रोपोनिक्सचा वापर :
व्हर्टिकल फार्मिंग करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. हायड्रोप्रोनिक्सचा वापर हा त्यातील एक महत्वाचा घटक म्हणता येईल. यामध्ये, रोपांच्या लागवडीसाठी मातीचा वापर करणे टाळतात. कारण मातीमध्ये अनेक प्रकारचे जीवजंतू असतात. व्हर्टिकल फार्मिंग करताना रोगाचा किंवा कोणत्याही किडीचा प्रभाव होऊ नये याकडे लक्ष दिले जाते. हायड्रोपोनिक्सच्या वापराअंतर्गत मातीऐवजी कोकोपीट किंवा द्रव्यांच्या आधारे रोपाची लागवड केली जाते.
सेंद्रिय खताचा जास्तीत जास्त वापर :
व्हर्टिकल फार्मिंग करताना सेंद्रिय खतांचा अधिकाधिक प्रमाणात वापर करणे फायद्याचे ठरते. कारण सेंद्रिय खतांचा वापर केल्यास रोपांवर त्याचा विपरीत परिणाम होत नाही.
प्रकाशासाठी आवश्यक व्यवस्था :
व्हर्टिकल फार्मिंग करताना रोपांना प्रकाश मिळेल याची खबरदारी घेणे गरजेचे आहे. जिथे शक्य आणि आवश्यक असेल तिथे सूर्यप्रकाश आणि जर सूर्यप्रकाश नसेल तर कृत्रिम प्रकाशाची व्यवस्था करणे आवश्यक आहे. अन्यथा रोपांच्या प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत अडथळा निर्माण होऊन रोपांची वाढ थांबू शकते.
प्रदीप बारपांडे
गार्डन आणि लँडस्केपिंग तज्ज्ञ