संरक्षण विभागात खूप भ्रष्टाचार
By Admin | Published: April 26, 2015 02:01 AM2015-04-26T02:01:12+5:302015-04-26T02:01:12+5:30
संरक्षण विभागात खूप भ्रष्टाचार आहे. त्यांच्या कामात पारदर्शकता नाही. शस्त्रास्त्रांची खरेदी करताना कोणताही विचार न करता ती करण्यात आली आहे.
पुणे : संरक्षण विभागात खूप भ्रष्टाचार आहे. त्यांच्या कामात पारदर्शकता नाही. शस्त्रास्त्रांची खरेदी करताना कोणताही विचार न करता ती करण्यात आली आहे. लष्कराला हवी असलेली शस्त्रे, उपकरणांऐवजी इतर वस्तूंचीच खरेदी करण्यात येत आली आहे, अशा शब्दात संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी संरक्षण विभागातील भ्रष्टाचाराची शनिवारी स्पष्ट कबुली दिली.
स. गो. बर्वे यांच्या शताब्दी वर्षानिमित्त स. गो. बर्वे प्रतिष्ठान व गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्थेच्या ‘डेव्हलपमेंट पॉलिसी इन महाराष्ट्र : प्रास्पेक्ट्स, चॅलेंजेस अॅन्ड आॅप्शन्स’ या स्मृती खंडाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी गोखले अर्थशास्त्र संस्थेचे संचालक राजेश परचुरे, प्रतिष्ठानच्या भूषणा करंदीकर, बळवंत बर्वे उपस्थित होते. पर्रीकर यांनी भाषण देण्याऐवजी उपस्थितांशी थेट चर्चाच केली.
पर्रीकर म्हणाले, भ्रष्टाचाराने या क्षेत्रात बजबजपुरी माजली आहे. संरक्षणावर खर्चासाठी देण्यात येणारा निधी योग्य पद्धतीने खर्च केले तर अतिरिक्त निधीची गरज भासणार नाही. सरकारे बदलली तरी शासकीय कर्मचाऱ्यांच्या मानसिकतेमध्ये बदल होत नाही. ही मानसिकता बदलेल आणि चांगली व त्वरेने कामे होतील. भारतीय वायूसेनेला अत्याधुनिक लढाऊ विमानांची आवश्यकता असताना गेल्या १५ वर्षांमध्ये एकही विमान खरेदी करण्यात आले नाही. केवळ चर्चा झाल्या पण निर्णय घेतला गेला नाही. मिग २१ हि विमाने कालबाह्य झाल्याने त्यांच्या जागी वायूसेनेत नव्या जनरेशनची चांगली विमाने आणणे गरजेचे आहे. त्यामुळे राफेल विमाने घेण्याचा निर्णय घेण्यात आला, असेही त्यांनी सांगितले.