दुर्दैवी! आईचा कोरोनामुळे मृत्यू, सांत्वनासाठी आलेल्या मुलीचा सर्पदंशाने मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2021 03:18 PM2021-05-22T15:18:20+5:302021-05-22T15:18:49+5:30
बारामती तालुक्यातील ढाळे कुटूंबियांवर दु:खाचा डोंगर
मेखळी: काही दिवसांपूर्वी आईचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यानंतर कुटुंबियांच्या सांत्वनासाठी आलेल्या मुलीवर देखील सर्पदंशाने मृत्यू झाला. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
बारामती तालुक्यातील जळोची गावात राहणाऱ्या ढाळे कुटुंबियांच्या वर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. शुक्रवार (दि.२१ मे) रोजी जळोची येथे मनीषा ठोंबरे यांचा सुर्पदंशामुळे मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वीच आई सरूबाई बंडा ढाळे (रा.जळोची) यांचा कोरोना मुळे मृत्यू झाला.कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी त्यांची मुलगी मनीषा ठोंबरे (रा.रेडणी,इंदापूर) या ठिकाणाहून जळोची गावात आल्या होत्या.
राहत्या घरी सकाळी साडेसातच्या दरम्यान झाडलोट करत असताना त्यांना पायाला सर्पदंश झाला. सर्पदंश झाल्यानंतर त्यांनी साप पाहिला पण साप अडचणीत गेल्याने परत दिसला नाही.सर्पदंशानंतर त्यांना तात्काळ बारामती येथे उपचाराकरिता दवाखान्यात हलवण्यात आले. परंतु त्यांना वाटेतच जास्त त्रास होऊ लागला.सर्पदंशावर उपचारासाठी लागणारे व्हेंटिलेटर बेड मिळवण्यासाठी ठोंबरे यांना बारामती मधील बऱ्याच हॉस्पिटलमध्ये फिरवले मात्र कोरोनामुळे बेड कमी असल्यामुळे त्यांना बेड उपलब्ध झाला नाही व यादरम्यान त्यांचा सकाळी १० च्या दरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर त्यांना जळोची येथुन त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यासाठी नेण्यात आले. त्यांना तीन वर्षांची मुलगी व सहा वर्षांचा एक मुलगा आहे. त्यानंतर दुपारी ३ च्या सुमारास कुटुंबियांना त्याच जागेवर कपडे धुण्याच्या मशिनजवळ फरशीखाली जाताना एक साप दिसला असता ढाळे कुटुंबियांनी बारामती येथील ग्रीन वर्ल्ड फाऊंडेशन संस्थेचे सर्पमित्र अमोल जाधव यांना फोन करून पाचारण केले. सर्पमित्र जाधव यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत फरशी खाली लपलेला तीन फूट लांबीचा 'इंडियन स्पेक्टॅकल कोब्रा' जातीच्या विषारी नागाला मोठ्या शिताफीने पकडले. सर्पमित्र अमोल जाधव यांनी कुटुंबियांचे सांत्वन करून सदरील विषारी नागाला बारामती वनविभागाच्या ताब्यात दिले. वन कर्मचाऱ्यांनी वनविभागाच्या निर्जनस्थळी निसर्गात या सापाला मुक्त केले.