वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वेताळ टेकडीची ‘वाट’ लावणार; पुणे महापालिकेचा नवा ‘प्लान’ रेडी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2023 01:27 PM2023-08-30T13:27:03+5:302023-08-30T13:27:46+5:30
वेताळ टेकडीचे नुकसान होणार असल्याने पुणेकरांचा विरोध, पालिकेने अलाइनमेंट बदलूनही अधिक नुकसान
पुणे: बालभारती-पौड रस्त्याच्या प्रकल्पात महापालिकेने पुन्हा बदल केले असून, टेकडीची वाट लावण्यासाठी ‘नवा प्लान’ बनवला आहे. रस्त्यातील हे नवीन बदल टेकडीसाठी अधिक घातक आहेत. नव्या प्लानसाठी पर्यावरणावरील नुकसानीच्या प्रभावाचा (ईआयए) अहवालही केलेला नाही. जुन्या अहवालावरच हा प्रकल्प रेटला जात आहे. तज्ज्ञ समितीचा अंतिम अभिप्राय असल्याशिवाय प्रकल्प करू नये, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिलेले असतानाही त्याकडेही दुर्लक्ष करून हा प्रकल्प पुणे महापालिका रेटत आहे, अशी माहिती महापालिकेच्या तज्ज्ञ समितीचे सदस्य प्रशांत इनामदार यांनी दिली आहे.
लॉ कॉलेज रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पुणे महापालिकेने बालभारती-पौड रस्ता प्रस्तावित केला. यामुळे वेताळ टेकडीला नुकसान होणार असल्याने पुणेकरांनी विरोध केला; परंतु काही दिवस शांत बसल्यानंतर पुणे महापालिकेने आता पुन्हा या रस्त्याच्या अलाइनमेंट बदलल्या आहेत. त्या अतिशय मोठ्या असून, त्यामुळे टेकडीचे अधिक नुकसान होणार आहे. त्याची माहिती बालभारती-पौड रस्त्यासाठी महापालिकेने स्थापन केलेल्या तज्ज्ञ समितीचे सदस्य प्रशांत इनामदार यांना माहिती अधिकाराखाली समजली. त्यामुळे त्यांनी लगेच महापालिका आयुक्तांना पत्र लिहून हा प्रकल्प थांबविण्याची मागणी केली आहे.
नव्या बदलांसाठी पुन्हा नवीन ‘ईआयए’ अहवाल आणि वाहतूक कोंडीचा सर्व्हे करणे अपेक्षित आहे. जो महापालिकेने केलेला नाही. त्यामुळे हा प्रकल्प ते राबवू शकत नाहीत. तसेच उच्च न्यायालयाने या प्रकल्पाबाबत अतिशय महत्त्वपूर्ण निर्देश दिलेले आहेत. त्यात असे म्हटले आहे की, तज्ज्ञ समितीच्या अंतिम अभिप्रायानंतरच हा प्रकल्प राबवावा; परंतु महापालिकेने या तज्ज्ञ सदस्यांना कानाडोळा करून प्रकल्प पुढे रेटण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे, असेही इनामदार म्हणाले.
काय केले नवे बदल?
- पूर्वी टेकडीवरून रस्ता जाणार होता. तो आता उड्डाणपुलात रूपांतरित केला जाणार आहे.
- पौड रस्त्याजवळ पूल संपतो तिकडे दोन्ही बाजूला टाऊनशिपला मान्यता
- सेनापती बापट रस्त्यावर भुयारी मार्ग आणि उड्डाणपूल प्रस्तावित
जुलै २०२३ मध्ये नवीन बदल केले
महापालिकेने प्रकल्पामध्ये जुलै २०२३ मध्ये नवीन बदल केले. त्याची माहिती आम्हाला देखील देण्यात आली नाही. उच्च न्यायालयानुसार ते तज्ज्ञ सदस्यांना देणे बंधनकारक आहे. तसेच नवीन बदलांचा पुन्हा पर्यावरणावर परिणाम करणारा अहवाल (ईआयए) करणे अपेक्षित आहे. जो केलेला नाही. जुन्या अहवालांवर हा प्रस्ताव रेटला जात आहे. नवीन टाऊनशिपला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे तिथे सर्वच बाबतीत प्रदूषण होईल. म्हणून हा प्रस्ताव सुरू करू नये आणि पुन्हा नव्याने ‘ईआयए’ अहवाल करावा आणि वाहतुकीचा सर्वेही करावा. - प्रशांत इनामदार, सदस्य, पुणे महापालिका बालभारती-पौड रस्ता तज्ज्ञ समिती
बालभारती - पौड रस्त्याची गरजच नाही
सध्या मेट्रोचा विस्तार होत आहे. पुणेकरांनी त्याचा अधिकाधिक वापर करावा. त्यामुळे वाहतूक कोंडी होणार नाही. तसेच पर्यावरणाचे नुकसान थांबेल. मेट्रोचा वापर वाढला तर बालभारती - पौड रस्त्याची गरजच नाही. - सुमिता काळे, सदस्य, वेताळ टेकडी बचाव कृती समिती
टेकडीखालील पाण्याचे स्त्रोत नष्ट होतील
मेट्रोमुळे कोथरुडच्या रहिवाशांना औंध, हिंजेवाडी, पिंपरी चिंचवडला अतिशय कमी वेळेत पोहोचता येईल. त्याचा वापर नागरिकांनी करावा. टेकडीवरून रस्ता केला तर त्यामुळे ३ हजार झाडे कापावी लागतील. टेकडीखालील पाण्याचे स्त्रोत नष्ट होतील, त्याने पाण्याची पातळी खालावेल. म्हणून हे सर्व थांबविण्यासाठी प्रकल्प बंद करणे हेच योग्य आहे. - डाॅ. सुषमा दाते, सदस्य, वेताळ टेकडी बचाव कृती समिती