गप्पागोष्टी, खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रमातून पुण्यात रंगला ज्येष्ठ कलाकारांचा स्नेहमेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 02:58 PM2018-01-18T14:58:11+5:302018-01-18T15:00:39+5:30
एकमेकांशी सुखदु: ख शेअर करीत जुन्या आठवणींना उजाळा देत गप्पागोष्टी, मैदानी खेळ, स्पर्धा आणि संगीत रजनी अशा विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून ज्येष्ठ कलाकारांनी एक अविस्मरणीय दिनु अनुभवला.
पुणे : एकमेकांशी सुखदु: ख शेअर करीत जुन्या आठवणींना उजाळा देत गप्पागोष्टी, मैदानी खेळ, स्पर्धा आणि संगीत रजनी अशा विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून ज्येष्ठ कलाकारांनी एक अविस्मरणीय दिनु अनुभवला. कलाकारांसाठी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तोही भेटीगाठीचा...
निमित्त होते, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पुणे शाखेच्या वतीने कर्वेनगर येथील राजेंद्रबन येथे आयोजित ज्येष्ठ कलाकारांच्या स्नेहमेळाव्याचे. रंगभूमी, चित्रपट आणि मालिकेमधील तारका मेळाव्यात अवतरले होते. ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर, सुहासिनी देशपांडे, जयमाला इनामदार, आशु, रजनी भट, भारती गोसावी, स्वरूपकुमार,भाग्यश्री देसाई, आसावरी तारे, विजय पटवर्धन, श्रीराम रानडे, दिलीप आव्हाळ आदी विविध कलाकार मेळाव्यात सहभागी झाले होते. सकाळी नऊ वाजता हास्यक्लबपासून मेळाव्याला प्रारंभ झाला. पपीचंद श्रीश्रीमाळ आणि गंगासागर यांनी मैदानी खेळातून कलाकारांना दमवले. चैताली माजगावकर हिने कलाकारांसाठी खास खेळ घेऊन रंगत आणली. वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र भामरे यांनी पुण्याच्या प्रदूषणाची माहिती देण्याबरोबरच वाहतुकीसंदर्भात कोणत्या समस्या आहेत या कलाकारांकडून जाणून घेतल्या.
ज्योती चांदेकर, जयमाला इनामदार, भाग्यश्री देसाई, रेश्मा मुसळे, पराग चौधरी, वर्षा संगमनेरकर यांनी एकपात्री अविष्कारांचे सादरीकरण केले. मेलडी मेकर्स, सरगम, रश्मी नाईक यांनी एकत्र येऊन आॅर्केस्ट्रा सादर केला. या संगीत रजनीने कलाकारांची मने जिंकली.
या स्नेहमेळाव्याला ज्येष्ठ गायक पं. चंद्रकांत लिमये, श्रद्धानंद भोसले, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, नाट्य परिषद पुणे शाखेचे अध्यक्ष सुरेश देशमुख आणि प्रमुख कार्यवाह दीपक रेगे उपस्थित होते.