दिग्गज उमेदवारांमध्ये होणार लढत

By admin | Published: October 12, 2016 03:00 AM2016-10-12T03:00:58+5:302016-10-12T03:00:58+5:30

महत्त्वाकांक्षी स्मार्ट सिटी योजनेतील मॉडेल एरिया म्हणून चर्चेत आलेले औंध व हॅरिस ब्रिज मार्गे शहराचे प्रवेशद्वार असलेले बोपोडी अशा दोन प्रमुख

The veteran candidates will be contesting | दिग्गज उमेदवारांमध्ये होणार लढत

दिग्गज उमेदवारांमध्ये होणार लढत

Next

पुणे : महत्त्वाकांक्षी स्मार्ट सिटी योजनेतील मॉडेल एरिया म्हणून चर्चेत आलेले औंध व हॅरिस ब्रिज मार्गे शहराचे प्रवेशद्वार असलेले बोपोडी अशा दोन प्रमुख विभागांचे एकत्रीकरण करून प्रभाग क्रमांक ८ तयार करण्यात आला आहे. या प्रभागामध्ये २ माजी महापौरांसह आजी-माजी नगरसेवक असलेले दिग्गज उमेदवार आमनेसामने येणार असल्याने अटीतटीची लढत पाहायला मिळेल.
चार सदस्यीय प्रभागांची रचना करताना ८५ हजार लोकसंख्येचे बंधन घालण्यात आले होते. औंध-बोपोडी या प्रभागाची लोकसंख्या ८४ हजार ४०६ इतकी असून तो शहरातील मोठ्या प्रभागांपैकी एक बनला आहे. आरक्षण सोडतीमध्ये या प्रभागातील एक जागा अनुसूचित जाती (एससी) महिला, इतर मागासवर्ग (ओबीसी) महिला व दोन जागा खुल्या गटासाठी पडल्या आहेत.
यशदा, सिंध सोसायटी, मानससरोवर, पंचवटी, सुवर्ण युग सोसायटी, विधाते कॉलनी, औंध रोड, औंध आयटीआय रोड आदी उच्चभ्रू सोसायट्यांचा भाग या परिसरात समाविष्ट झाला आहे. त्याचबरोबर बोपोडी गावठाण, डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर, कस्तुरबा वसाहतीचा काही भाग आदी झोपडपट्टीचा परिसर येत आहे. बोपोडीमध्ये दक्षिण भारतीयांची संख्या मोठी आहे, ते अनेक वर्षांपासून तिथले स्थानिक रहिवाशी आहेत. त्यामुळे उच्चभ्रू, गरीब, मध्यमवर्गीय, मूळचे पुणेकर, स्थलांतरित, परप्रांतीय अशा संमिश्र स्वरूपाच्या मतदारांनी हा प्रभाग बनला आहे.
महापालिकेच्या २०१२मध्ये झालेल्या निवडणुकीत बोपोडीच्या प्रभागातून प्रकाश ढोरे व अर्चना कांबळे हे मनसेचे नगरसेवक विजयी झाले होते. प्रकाश ढोरे यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपामध्ये प्रवेश केला आहे.
अनुसूचित जाती महिला या जागेवरून अर्चना कांबळे मनसेकडून पुन्हा लढणार आहेत. औंधमधून काँग्रेसकडून संगीता दत्तात्रय गायकवाड व सनी निम्हण विजयी झाले होते. सनी निम्हण यंदा शिवसेनेकडून निवडणूक लढणार आहेत. त्याचबरोबर विद्यमान नगरसेवक कैलास गायकवाड, संगीता गायकवाड, बाबूराव चांदेरे यांच्या प्रभागातील काही भाग या ४ सदस्यीय नवीन प्रभागात समाविष्ट झाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून खुल्या जागेवरून श्रीकांत पाटील, बाळासाहेब रानवडे निवडणूक लढण्याची शक्यता आहे. माजी महापौर सुरेश शेवाळे यांनी नुकताच भाजपामध्ये प्रवेश केला आहे. ते भाजपातर्फे या प्रभागातून उभे राहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर, काँग्रेसकडून माजी महापौर दत्तात्रय गायकवाड हेदेखील उभे राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्याचबरोबर, माजी नगरसेवक आनंद छाजेड, शैलजा खेडेकर यादेखील काँग्रेसकडून इच्छुक आहेत. मनसेकडून औंध भागातील नाना वाळके इच्छुक आहेत.
अनेक दिग्गज उमेदवार या भागात आमनेसामने येत असल्याने अत्यंत चुरशीची लढत या ठिकाणी होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. उमेदवारांकडून सध्या चाचपणी सुरू असून कार्यकर्त्यांचा बैठका, भेटीगाठी यांना सुरुवात झाली आहे.
(प्रतिनिधी)

Web Title: The veteran candidates will be contesting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.