'स्वरांगिणी' हरपली; ज्येष्ठ शास्त्रीय गायिका 'पद्मविभूषण' प्रभा अत्रे काळाच्या पडद्याआड
By श्रीकिशन काळे | Published: January 13, 2024 10:27 AM2024-01-13T10:27:18+5:302024-01-13T10:30:28+5:30
अत्रे या अग्रगण्य हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायिकांपैकी एक म्हणून गणल्या जात होत्या....
पुणे : Prabha Atre- जेष्ठ प्रतिभावंत गायिका, संगीत रचनाकार, लेखिका, प्राध्यापिका व विदुषी म्हणून प्रसिद्ध असलेल्या स्वरयोगिनी प्रभा अत्रे (९२) यांचे शनिवारी सकाळी निधन झाले. ख्याल गायकीसोबत ठुमरी, दादरा, गझल, उपशास्त्रीय संगीत, नाट्य संगीत, भजन व भावसंगीत गायकीवरही त्यांचे प्रभुत्व होते. भारतीय शास्त्रीय संगीताचा जगभर प्रसार करण्यासाठी त्या सध्या युट्यूबच्या माध्यमातून काम करत होत्या. त्यांना हृदयविकाराचा झटका आला म्हणून खासगी रूग्णालयात दाखल केले होते. परंतु उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे नातेवाईक अमेरिकेत असल्याने ते आल्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.
अत्रे या अग्रगण्य हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायिकांपैकी एक म्हणून गणल्या जात होत्या. त्या पं. सुरेशबाबू माने आणि हिराबाई बडोदेकर यांच्या शिष्या होत्या. भारत सरकारने त्यांना संगीतक्षेत्रातील योगदानाबद्दल १९९० मध्ये "पद्मश्री" आणि २००२ मध्ये "पद्मभूषण" पुरस्काराने सन्मानित केले होते. हे पुरस्कार भारतातील अनुक्रमे चौथ्या तिसऱ्या क्रमांकाचे पुरस्कार आहेत. तसेच २०२२ मध्ये "पद्मविभूषण" देऊन त्यांचा गौरव केला. हा भारतरत्न नंंतर सर्वोच्च नागरी सन्मान आहे.
भारतीय शास्त्रीय संगीताचा जगभर प्रसार करण्याच्या कार्यात त्यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. ’स्वरमयी’, ‘सुस्वराली’, ‘‘स्वरांगिणी’, ‘स्वररंजिनी’ या संशोधनपर संगीतविषयक पुस्तकांसह ‘अंत:स्वर’ या काव्यसंग्रहाचे लेखन त्यांनी केले. पुण्यात 'स्वरमयी गुरुकुल' संस्थेची स्थापना करून त्यांनी त्याद्वारे पारंपरिक गुरु-शिष्य शैलीतील संगीत शिक्षण व समकालीन संगीत शिक्षणाचा मेळ घातला. या संस्थेमार्फत, प्रभा अत्रे फाउंडेशनद्वारा अनेक नव्या कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले.
संगीत शिकत असताना विज्ञान व कायदा विषयांत पदवी-
प्रभा अत्रे यांचा जन्म पुण्यात आबासाहेब व इंदिराबाई अत्रे यांचे पोटी झाला. इंदिराबाई गाणे शिकत असताना त्यापासून प्रेरित होऊन प्रभाताई वयाच्या आठव्या वर्षी शास्त्रीय गायनाकडे वळल्या. हिराबाईंकडे शिकत असताना प्रभाताई त्यांना भारताच्या विविध भागांत होणाऱ्या कार्यक्रमांत साथ करत असत. संगीत शिकत असतानाच त्यांनी विज्ञान व कायदा विषयांत पदवी संपादन केली. नंतर त्यांनी संगीतात डॉक्टरेटही केली. आबासाहेब अत्रे यांनी पुण्यात रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटी स्थापन करून मुलीसाठी हायस्कूल काढले ते आजही नावलौकिक मिळवत आहे.
शास्त्रीय संगीताचा जगभर प्रसार
प्रतिभावंत गायिका, संगीत रचनाकार, लेखिका, प्राध्यापिका व विदुषी म्हणून प्रभा अत्रे यांचा लौकिक आहे. ख्याल गायकीसोबत ठुमरी, दादरा, गझल, उपशास्त्रीय संगीत, नाट्य संगीत, भजन व भावसंगीत गायकीवरही त्यांचे प्रभुत्व आहे. भारतीय शास्त्रीय संगीताचा जगभर प्रसार करण्याचे कामी त्यांचे मोठे योगदान गणले जाते. आपल्या कार्यक्रमांत त्या अनेकदा स्वतः रचलेल्या बंदिशी सादर करतात. त्यांच्या काही रचना, जसे, मारू बिहाग रागातील 'जागू मैं सारी रैना', कलावती रागातील 'तन मन धन', किरवाणी रागातील 'नंद नंदन', ह्या श्रोतृवृंदाच्या विशेष पसंतीच्या रचना आहेत.
संगीत नाटकांमध्ये प्रमुख भूमिका
प्रभाताईंनी अपूर्व कल्याण, मधुरकंस, पटदीप - मल्हार, तिलंग - भैरव, भीमकली, रवी भैरव यांसारख्या नव्या रागांची रचनाही केली आहे. तसेच किराणा घराण्याच्या गायकीत त्यांनी प्रथमच टप्पा गायनाचा परिचय करवून दिला. तरुण वयात प्रभाताईंनी संगीत शारदा ,संगीत विद्याहरण, संगीत संशयकल्लोळ, संगीत मृच्छकटिक, बिरज बहू, लिलाव यांसारख्या संगीत नाटकांमध्ये प्रमुख स्त्री भूमिका केल्या. इ.स. १९५५ पासून त्या देशोदेशी आपले गायनाचे कार्यक्रम सादर करत आहेत. भारताच्या व विदेशांतील अनेक ख्यातनाम व महत्त्वपूर्ण संगीत महोत्सवांमध्ये त्यांचे कार्यक्रम सादर झाले आहेत.
आपल्या कार्यक्रमांत त्या अनेकदा स्वतः रचलेल्या बंदिशी सादर करत. त्यांच्या काही रचना, जसे, मारू बिहाग रागातील 'जागू मैं सारी रैना', कलावती रागातील 'तन मन धन', किरवाणी रागातील 'नंद नंदन', ह्या श्रोतृवृंदाच्या विशेष पसंतीच्या रचना होत्या. प्रभाताईंनी अपूर्व कल्याण, मधुरकंस, पटदीप - मल्हार, तिलंग - भैरव, भीमकली, रवी भैरव यांसारख्या नव्या रागांची रचनाही केली आहे. तसेच किराणा घराण्याच्या गायकीत त्यांनी प्रथमच टप्पा गायनाचा परिचय करवून दिला होता. तरुण वयात प्रभाताईंनी संगीत शारदा ,संगीत विद्याहरण, संगीत संशयकल्लोळ, संगीत मृच्छकटिक, बिरज बहू, लिलाव यांसारख्या संगीत नाटकांमध्ये प्रमुख स्त्री भूमिका केल्या. इ.स. १९५५ पासून त्या देशोदेशी आपले गायनाचे कार्यक्रम सादर करत होत्या. भारताच्या व विदेशांतील अनेक ख्यातनाम व महत्त्वपूर्ण संगीत महोत्सवांमध्ये त्यांचे कार्यक्रम सादर झाले आहेत.
किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांचे आज (शनिवारी दिनांक १३ जानेवारी २०२४) पहाटे ३.३०च्या सुमारास दु:खद निधन झाले. त्या ९१ वर्षाच्या होत्या. डॉ. प्रभा अत्रे यांची अमेरिकास्थित भाची पुण्यात आल्यानंतर मंगळवारी अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यानुसार अंत्यदर्शनाची वेळ कळवण्यात येईल.
- प्रसाद भडसावळे (स्वरमयी गुरुकुल)