हक्काच्या घरासाठी वयोवृद्ध दाम्पत्याचा संघर्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 02:27 AM2018-05-08T02:27:32+5:302018-05-08T02:27:32+5:30
रावणगाव (ता.दौंड) येथील वामन व हरूबाई बिबे वृद्ध दाम्पत्य आर्थिक-सामाजिक सर्वेक्षणामधील यादीत (दारिद्र्यरेषेखाली) असतानाही शासनाच्या घरकुल योजनेपासून त्यांना कित्येक वर्षांपासून वंचित आहेत.
रावणगाव - रावणगाव (ता.दौंड) येथील वामन व हरूबाई बिबे वृद्ध दाम्पत्य आर्थिक-सामाजिक सर्वेक्षणामधील यादीत (दारिद्र्यरेषेखाली) असतानाही शासनाच्या घरकुल योजनेपासून त्यांना कित्येक वर्षांपासून वंचित आहेत.
रावणगाव ग्रामपंचायत प्रशासन या वृद्ध दाम्पत्यास घर बांधण्यासाठी जागा नसल्याचे कारण सांगून घरकुल देण्यास टाळाटाळ करीत आहे. वामन कृष्णा बिबे व त्यांची पत्नी हरूबाई आज वयाच्या नव्वदीच्या घरात असताना या वयात त्यांना अशा मोडक्या छपराच्या घरात आपला संसार थाटावा लागत आहे. त्यामुळे ‘कोणी घर देता का घर’ असे म्हणण्याची या वयात त्यांच्यावर वेळ आली आहे. पावसाळा जवळ आला असून पावसाळ्यात त्यांच्या घरात गुडघाभर पाणी साचते आणि तशातच ते राहतात.
या बिबे दाम्पत्याचा राज्य शासनाच्या आर्थिक - सामाजिक सर्वेक्षणामधील यादीतील कुटुंबाची नोंदणी झालेली असून याची कोणीही दखल घेत नाही. या वृद्ध दाम्पत्यास गेल्या कित्येक वर्षांपासून शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ मिळाला नाही. बिबे दाम्पत्यास चार मुले होती. त्यापैकी तीन मुले मरण पावली असून एक मुलगा बाहेरगावी राहतो. त्यामुळे त्यांना आता कोणाचाही आधार नाही. परिणामी या वयातही हरूबाई व वामन बिबे हे वृद्ध दाम्पत्य दुसऱ्याच्या शेतात सालकरी म्हणून काम करून आपली उपजीविका करीत आहेत. हे दाम्पत्य वारंवार रावणगाव ग्रामपंचायतीकडे घरकुल मिळावे, म्हणून हेलपाटे मारत आहेत. तरीदेखील त्यांना घरकुलापासून वंचित ठेवले आहे. याबाबत रावणगावचे ग्रामविकास अधिकारी खोमणे म्हणाले, की जागेअभावी या वृद्ध दाम्पत्यास घरकुल देता येत नाही. दौंड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गणेश मोरे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही.
...तर आमरण उपोषणास बसणार
याबाबत हरूबाई बिबे म्हणाल्या, की आता पावसाचे दिवस जवळ आलेले असल्यामुळे मला जर शासनाने लवकरात लवकर घरकुल दिले नाही, तर मी येत्या काही दिवसांतच रावणगाव ग्रामपंचायतीसमोर आमरण उपोषणाला बसणार आहे.