जेष्ठ लावणी कलावंत गुलाबबाई संगमनेरकर यांचे वृद्धापकाळाने निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2022 05:28 PM2022-09-14T17:28:33+5:302022-09-14T17:28:55+5:30

दोन वर्षांपूर्वीच राज्य शासनाने त्यांना ’विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान केला होता

Veteran planting artist Gulabbai Sangamnerkar passed away due to old age | जेष्ठ लावणी कलावंत गुलाबबाई संगमनेरकर यांचे वृद्धापकाळाने निधन

जेष्ठ लावणी कलावंत गुलाबबाई संगमनेरकर यांचे वृद्धापकाळाने निधन

googlenewsNext

पुणे : अवघे आयुष्य लावणीसाठी समर्पित केलेल्या, लावणीचे स्वत:चे घराणे निर्माण केलेल्या आणि बैठकीच्या लावणीमधील मानाचे पान ठरलेल्या ज्येष्ठ लावणी कलावंत गुलाबबाई संगमनेरकर (वय 90) यांचे पुण्यात वृद्धापकाळाने निधन झाले. दोन वर्षांपूर्वीच राज्य शासनाने त्यांना ’विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान केला होता. त्यांच्या पश्चात लावणी कलावंत वर्षा संगमनेरकर यांच्यासह तीन
मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

वयाच्या नवव्या वर्षापासूनच लावणीच्या क्षेत्रात प्रवेश केलेल्या गुलाबबाई यांनी शेवटच्या श्वासापर्यंत ही कला जपली आणि नव्या पिढीमध्ये रूजविण्यासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची केले.

गुलाबबाई यांचा जन्म १९33 साली झाला.  लावणीच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या त्यांच्या आईची स्वत:ची संगीत पार्टी होती. त्यामुळे कलेचे बाळकडू त्यांना आई राधाबाई बुधगावकर यांच्याकडून मिळाले. त्यानंतर छबू नगरकर, सुगंधा सिन्नरकर यांच्याकडे त्यांनी लावणीचे धडे गिरविले. या दोन्ही ठिकाणी काही गोष्टी शिकल्यावर गुलाबबाई या बनुबाई शिर्डीकर यांच्या पार्टीत दाखल झाल्या. लहान वयातच गुलाबबाई यांनी फडाच्या तमाशातही काम केले. खानदेशमधील आनंदराव महाजन, तमाशासम्राट तुकाराम खेडकर, कांताबाई सातारकर यांच्या पार्टीमध्ये काम केल्यानंतर गुलाबबाईंनी स्वत:ची संगीतबारी सुरू करण्यासाठी कलानगरी म्हणून ओळख असलेल्या कोल्हापूरची निवड केली. हळूहळू महाराष्ट्रात नावलौकिक झाल्यावर मुंबई दौ-यात गुलाबबाईंना एच.एम.व्ही. या नामांकित कंपनीने निमंत्रित केले. एच.एम.व्ही. कंपनीने काढलेल्या ध्वनिमुद्रणाला (रेकॉर्ड) चांगला प्रतिसाद मिळाला. रेडिओवरून या लावण्या प्रसारित होऊ लागल्या. 

दिल्लीला महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने यशवंतराव चव्हाण यांनीआयोजित केलेल्या  एका विशेष कार्यक्रमात महाराष्ट्रातून गुलाबबाईंना दिल्लीत कार्यक्रम सादर करण्याची संधी मिळाली. प्रकाश इनामदार आणि जयमाला इनामदार यांच्या ‘गाढवाचं लग्न’ या वगनाटयामध्ये त्यांनी पार्श्वगायन केले. बहीण मीरा हिच्यासमवेत आर्यभूषण थिएटरमध्ये   ‘गुलाब-मीरा संगमनेरकर’  या नावाने स्वतंत्र पार्टी सुरू केली. गुलाबबाई यांचे गायन आणि मीराचा नृत्याविष्कार हे या पार्टीचे वैशिष्ट्य होते.  पुण्यात आर्यभूषण थिएटरला त्यांच्या संगीत पार्टीचे कार्यक्रम जोरात सुरू असतं. गुलाबबाई संगमनेरकर हे नाव अभिजन वर्गातही गाजू लागले. त्याचदरम्यान लता मंगेशकर यांच्या'आजोळच्या गाणी' या ध्वनिचित्रफितीत एक लावणीवर गुलाबबाई संगमनेरकर यांनी अदाकारी केली. ’रज्जो’ नावाच्या हिंदी चित्रपटातही त्यांनी भूमिका साकारली आहे. लावणीमधील त्यांच्या योगदानाबदद्ल विविध मान-सन्मानाच्या त्या मानकरी ठरल्या आहेत.

Web Title: Veteran planting artist Gulabbai Sangamnerkar passed away due to old age

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.