९०व्या वर्षी बालसाहित्य वाचून परी व्हावं वाटतं- डॉ. प्रभा अत्रे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2023 12:25 PM2023-08-20T12:25:30+5:302023-08-20T12:26:30+5:30
बालसाहित्यकार पुरस्कार संगीता बर्वे यांना प्रदान
लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे: मला वयाच्या ९० व्या वर्षीदेखील बालसाहित्य वाचावं वाटतं. लहान मुलांसारखं व्हावं वाटतं. वाचताना मी पुन्हा लहान होते. परीचे पंख लावून उडावं वाटतं. राक्षसाचा खूप राग येतो. आईने दिलेली बालगीते मला आवडायची. या लांब प्रवासात आईची आठवण कधीच पुसट झाली नाही. मागे वळून पाहते, तेव्हा मनात येते पुन्हा लहान व्हावं. आईच्या मागे लागावं. तिच्या पदराआड लपावं. तिच्याकडून गोष्टी ऐकाव्यात, खेळावं, मस्ती करावी, अशा भावना ज्येष्ठ शास्त्रीय गायिका स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांनी व्यक्त केल्या.
स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे पुरस्कृत पहिला इंदिरा अत्रे बालसाहित्यकार पुरस्कार डॉ. संगीता बर्वे यांना प्रभा अत्रे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. शिक्षिका, लेखिका इंदिरा अत्रे यांच्या बालसाहित्याच्या पुस्तिकाच्या नव्या आवृत्तीचे प्रकाशन झाले. यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, व्यास क्रिएशन्सचे नीलेश गायकवाड, संजीव ब्रह्मे, ग्रंथपाल प्रसाद भडसावळे उपस्थित होते.
प्रभाताई म्हणाल्या, ईश्वराची माझ्यावर खूप मोठी कृपा आहे. संगीत माझ्या आयुष्यात आलं. संगीताने मला ओळख दिली. लहान मुलांचे भावविश्व समृद्ध करेल, असे बालसाहित्य निर्माण व्हायला हवे.