‘लिव्ह इन’मधून ज्येष्ठांनी थाटले पुन्हा संसार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 01:47 AM2019-01-21T01:47:43+5:302019-01-21T01:48:08+5:30

लग्न झाल्यापासून वार्धक्यापर्यंत अनेक सुख-दु:खात, संघर्षात, यशापशात साथ देणारा जोडीदार मध्यातूनच सोडून गेल्यावर एकट्या पडलेल्या ज्येष्ठांचे आयुष्य खडतर होते.

Veterans in the live-in world are back in the world | ‘लिव्ह इन’मधून ज्येष्ठांनी थाटले पुन्हा संसार

‘लिव्ह इन’मधून ज्येष्ठांनी थाटले पुन्हा संसार

Next

- लक्ष्मण मोरे 
पुणे : लग्न झाल्यापासून वार्धक्यापर्यंत अनेक सुख-दु:खात, संघर्षात, यशापशात साथ देणारा जोडीदार मध्यातूनच सोडून गेल्यावर एकट्या पडलेल्या ज्येष्ठांचे आयुष्य खडतर होते. मुलांचे होणारे दुर्लक्ष आणि एकटेपणाची भावना या ज्येष्ठांना मानसिक यातना देत राहते. त्यांच्या या समस्येवर ‘लिव्ह इन’चा उतारा लागू पडला असून ज्येष्ठ नागरिक लिव्ह इन रिलेशन मंडळाने केलेल्या प्रयत्नांमधून आतापर्यंत ३५ जोडपी सुखाने नांदत आहेत.
जोडीदाराचे निधन झाल्यानंतर घरामध्ये एकट्या पडलेल्या ज्येष्ठांच्या अडचणींना पारावारच रहात नाही. त्यांच्यासाठी सामाजिक कार्यकर्ते मोहन दामले यांनी संस्था सुरू केली. मध्यमर्गीय ज्येष्ठांचे वयोमान साधारणपणे ८० ते ९० च्या दरम्यान आलेले आहे. त्यामुळे खूप मोठा काळ त्यांना एकट्याने कंठावा लागतो. खऱ्या अर्थाने त्यांनाही जोडीदाराची आवश्यकता असते. दामले यांनी हाच मुद्दा घेऊन काही ज्येष्ठांशी सातत्यपूर्ण संवाद साधून त्यांना पुनर्विवाहासाठी उद्युक्त केले.
त्यांनी संस्थेद्वारे २०१० साली वाई येथे ७० वर्षीय ज्येष्ठाचा ६५ वर्षीय महिलेचा विवाह लावून दिला. तर काही दिवसातच त्यांनी एका ७२ वर्षीय ज्येष्ठासाठी ६५ वर्षीय जोडीदार शोधून त्यांचा विवाह लावून दिला. त्यामुळे त्यांचा उत्साह वाढला. मात्र, एका प्रसिद्ध महाविद्यालयाच्या निवृत्त प्राचार्याने स्वत:चा ठरविलेला विवाह त्यांच्या मुलाने उधळून लावला. त्यामुळे ते प्राचार्य विवाह न करताच निघून गेले. त्यातील वधूने मात्र दामले यांना काही मौलिक सूचना
त्यावेळी केल्या. त्यामुळे ज्येष्ठांचे पुनर्विवाह लावावेत की लावू नयेत याबाबत नेमके काय करायचे या विचारात ते होते.
त्याच दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने ‘लिव्ह इन रिलेशनशीप’ बाबत महत्त्वाचा निर्णय दिला होता. त्याचा अभ्यास केल्यावर दामले यांना लिव्ह इनचा पर्याय ज्येष्ठांसाठी अत्यंत फायदेशीर ठरु शकतो, असे वाटले. त्यामुळे त्यांनी ‘लिव्ह इन’बाबत ज्येष्ठांशी बोलण्यास सुरुवात केली. सुरुवातीला त्याला खूप विरोध झाला. मात्र, दोघांच्या राजीखुशीने करारनामा करून काही काळ एकत्र व्यतित केल्यावर दोघांची इच्छा असल्यास लग्नही करू शकतात, असा पर्याय पुढे आला. त्यामधून संपत्तीला कोणताही धोका नसल्याचे लक्षात आल्यावर मुलांमधून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळू लागला. या सर्व प्रयत्नांचा सकारात्मक परिणाम दिसू लागला असून २०१२ सालापासून सुरू झालेल्या या प्रयत्नांमधून आतापर्यंत ३५ जोडपी गुण्यागोविंदाने एकत्र ‘नांदत’ आहेत.
>हक्काचा माणूस हवा : एकटेपणावर पर्याय
अनेक ज्येष्ठांना आरोग्याच्या समस्या असतात. अनेकांना जेवणाची पथ्ये असतात. त्यामुळे त्यांना योग्य जोडीदार मिळाल्यास दोघेही एकमेकांची काळजी घेतात. पथ्यासह औषधांच्या वेळा सांभाळतात. मुळात संवाद साधायला, मोकळं व्हायला कोणीतरी हक्काचं माणूस मिळतं. त्यांच्यासोबत फिरणं, वेळ घालवणं सोप होतं. जोडपी ज्येष्ठ नागरिक लिव्ह इन रिलेशन मंडळाने केलेल्या प्रयत्नांमधून सुखाने नांदत आहेत. 2012 पासून ज्येष्ठ नागरिक लिव्ह इन रिलेशन मंडळाचे प्रयत्न सुरू झाले. ‘लिव्ह इन’बाबत ज्येष्ठांशी बोलण्यास सुरुवात केल्यावर सुरुवातीला विरोध झाला.
> सर्वोच्च न्यायालयाच्या लिव्ह इन बाबतच्या निर्णयामुळे ज्येष्ठांच्या एकटेपणावर पर्याय दिसू लागला. त्यातून अनेक ज्येष्ठांना जोडीदार शोधून देण्याचे काम सुरू झाले. मात्र, तिथेही संपत्ती हा मुद्दा होताच. त्यामुळे त्यांच्यामध्ये लेखी करार केले जाऊ लागले. त्यामध्ये संपत्तीबाबत स्पष्ट उल्लेख होतो. त्यामुळे, मुले आणि जोडीदार दोघेही समाधानी राहतात. सध्या पुणे आणि ठाण्यामध्ये हे काम सुरू आहे.
- मोहन रानडे, अध्यक्ष,
ज्येष्ठ नागरिक लिव्ह इन रिलेशन मंडळ

Web Title: Veterans in the live-in world are back in the world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.