पशुवैद्यकीय दवाखाने दयनीय, गटविकास अधिका-यांच्या निवासस्थानात चालते कामकाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 01:07 AM2017-09-20T01:07:02+5:302017-09-20T01:07:06+5:30
मावळ तालुक्यात शेतकरी वर्ग अधिक असून पशुधनही मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, या पशुधनाच्या उपचारासाठी असलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या इमारतींची स्थिती विदारक आहे.
वडगाव मावळ : मावळ तालुक्यात शेतकरी वर्ग अधिक असून पशुधनही मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, या पशुधनाच्या उपचारासाठी असलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या इमारतींची स्थिती विदारक आहे. वडगाव येथे दवाखान्यासाठी इमारतच नसल्याने थेट गटविकास अधिकारी यांच्या निवासस्थानात दवाखाना सुरु आहे. तर दुसरीकडे तळेगाव दाभाडे, कार्ला यासह तालुक्यातील इतर गावांमध्ये दवाखान्यांसाठी इमारत उपलब्ध आहे. मात्र, त्यांची स्थिती दयनीय असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत दिसून आले आहे.
वडगाव मावळ : वडगाव येथील पशुवैद्यकीय दवाखान्याला जागा मिळत नसल्यामुळे गेल्या पाच ते सहा वर्षांपासून हा दवाखाना वडगाव येथील महसूल भवनाशेजारी असलेल्या पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्या निवासस्थानात सुरू असल्याची माहिती पशुधन विकास अधिकारी अजय सुपे यांनी दिली.
सर्व सोयीसुविधा व प्रशस्त इमारत असलेल्या या दवाखान्यात नेहमीच वर्दळ असते. दवाखान्यातील कर्मचा-यांची दोन्ही पदे भरलेली असून, डॉक्टरही वेळेवर शेतक-यांना उपलब्ध होत असतात. इमारतीच्या परिसरात चांगल्या प्रकारची स्वच्छता आहे. वडगाव येथील हा दवाखाना कातवी, जांभूळ, सांगावी, साते, ब्राह्मणवाडी, मोहितेवाडी, कान्हे, वडगाव या गावांसाठी असून, या परिसरात मोठ्या प्रमाणात शेतकरीवर्ग असल्यामुळे जनावरांच्या उपचारासाठी दवाखान्यात येणा-यांची नेहमीच गर्दी असते. तसेच या भागातील शेतकरी हा प्रगतिशील शेतकरी म्हणून ओळखला जातो. या शेतक-यांकडे मोठ्या प्रमाणत जनावरे असतात. शेतकरी आपल्या शेतातच प्रशस्त असा गोठा बांधत असल्यामुळे त्यांना छोट्या-मोठ्या आजारासाठी जनावरांना दवाखान्यात नेणे शक्य नसते. अशा वेळी शेतकºयांनी फोन केल्यास डॉक्टर येत असल्याची माहिती शेतकºयांनी दिली. तसेच या दवाखान्यात गाय, म्हैस, बैल, घोडे, कुत्रा, पाळीव मांजर यांच्यावर विशेष उपचार केले जातात.
दवाखान्याच्या वतीने शेतक-यांना चारा वाढीसाठी मका, ज्वारी, कॅल्शियम पावडर शासकीय किमतीत दिली जाते. तसेच पशुधन विमा योजनादेखील वर्षभर राबवली जाते. यामध्ये शेतकºयांना कडबाकुटी मशिन व रबर मॅट वाटप केले जाते. तसेच दवाखान्यामार्फत वेगवेगळ्या गावांत शिबिरे घेतली जातात. यामध्ये वंध्यत्व उपचार व जनावरांची कशी काळजी घ्यायची, याचे प्रशिक्षण दिले जाते. अशा सर्व सोयीसुविधा असणाºया दवाखान्याला लवकरच शासकीय जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.