‘इनसायडर’च्या माध्यमातून जगभर पोहोचणार मराठी कवितेची स्पंदने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:10 AM2021-01-04T04:10:23+5:302021-01-04T04:10:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : सोशल मीडियाच्या माध्यमातून साहित्यविश्वात एक आगळावेगळा प्रयोग आकाराला आला आहे. गतवर्षी कोरोनाकाळात महाराष्ट्रातील काही ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सोशल मीडियाच्या माध्यमातून साहित्यविश्वात एक आगळावेगळा प्रयोग आकाराला आला आहे. गतवर्षी कोरोनाकाळात महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या कवींनी प्रत्येकी पाच मराठी कविता आणि त्यांचा इंग्रजी अनुवाद फेसबुकवर प्रसारित केला. या उपक्रमाला साहित्यवर्तुळातून उत्तम प्रतिसाद मिळाला.
राज्यातल्या विविध प्रांतांतून सहभाग नोंदवलेल्या कवींनी या प्रयोगातून मराठी कवितेची स्पंदने प्रातिनिधिक स्वरूपात अमराठी लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. त्यातील सोळा निवडक मान्यवर कवींच्या मराठी कविता आणि त्यांचा अनुवाद ’इनसायडर’ या द्विभाषिक काव्यसंग्रहाच्या माध्यमातून पुस्तकरूपात प्रकाशित होत आहे.
पुण्यातील ‘गोल्डन पेज पब्लिकेशन’ या प्रकाशन संस्थेने पुढाकार घेतला आहे. एकाच पुस्तकात वेगवेगळ्या कवींच्या मराठी आणि इंग्रजी भाषेतील कविता प्रकाशित होण्याचा हा कदाचित पहिलाच प्रयोग असेल!
या काव्यसंग्रहाला ज्येष्ठ समीक्षक डॉ. किशोर सानप यांची प्रस्तावना लाभली आहे. यामध्ये हेमंत जोगळेकर, नीलिमा गुंडी, सिसिलिया काव्हालो, अंजली कुलकर्णी, मनोहर सोनवणे, रवींद्र लाखे, सुनंदा भोसेकर, भारती बिर्जे-दिग्गीकर, श्रीधर नांदेडकर, अजय कांडर, पी. विठ्ठल, मीनाक्षी पाटील, प्रतिभा सराफ, वर्जेश सोळंकी, रमजान मुल्ला, गीतेश शिंदे आदी कवींचा समावेश आहे.
येत्या २६ जानेवारीला प्रजासत्ताकदिनी या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. मराठी कवितेत काय घडतंय, ती काय सांगू पाहते हे प्रातिनिधिक स्वरूपात महाराष्ट्राबाहेरील साहित्यरसिकांपर्यंत पोहोचविण्याबरोबरच ऑनलाईन माध्यमातूनही हे पुस्तक आम्ही जगभर वितरीत करून जगभरातील काव्यरसिकांना मराठी कवितेकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करणार आहोत. शिवाय भारतभरातील महत्त्वाच्या विद्यापीठांना आणि ग्रंथालयांना पुस्तकाच्या प्रती मोफत पाठवून तेथील वाचक-रसिकांना मराठी कवितेच्या अभ्यासासाठी लक्ष वेधणार आहोत. लवकरच या पुस्तकाचा दुसरा भाग प्रकाशित करण्याचाही आमचा मानस आहे, अशी माहिती प्रकाशक प्रदीप खेतमर आणि अमृता खेतमर यांनी दिली.
---
‘भारत हा बहुभाषिक व बहुसांस्कृतिक देश आहे व इतर भाषा व संस्कृती जाणिवा त्याद्वारे राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत करणे हा साने गुरुजींच्या आंतर भारतीचा विचार ‘इन साईडर’द्वारे अमलात येत आहे. मराठी काव्यविश्व किती कलात्मक व अर्थपूर्ण आहे हे या द्विभाषिक काव्यासंग्रहाद्वारे भारतीय वाचकांना समजून घेता येईल.
- लक्ष्मीकांत देशमुख, माजी संंमेलनाध्यक्ष
---
आम्ही गेल्या वर्षी कोरोनाकाळात मराठी कविता आणि त्याचा इंग्रजी अनुवाद प्रसारित करण्याचा आगळावेगळा उपक्रम फेसबुकवर राबविला. आजवर कवींच्या वैयक्तिक कविता अनुवादित झाल्या आहेत. पण एकाच पुस्तकात सोळा कवींच्या कवितांचा वेगवेगळ्या अनुवादकांनी केलेला इंग्रजीमधील अनुवाद प्रथमच प्रसिद्ध होत आहे.
- अंजली कुलकर्णी, प्रसिद्ध कवयित्री
फोटो ओळ : महाराष्ट्रातील सोळा कवींच्या मराठी कविता आणि त्याचा इंग्रजी अनुवाद ‘इनसाईडर’ काव्यसंग्रहांच्या माध्यमातून प्रकाशित होणार आहे.