प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ अजित रानडे यांची गोखले इन्स्टिट्यूटच्या कुलगुरू पदावरून हकालपट्टी; यूजीसीने दिलं नियमांचे कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2024 11:41 AM2024-09-15T11:41:19+5:302024-09-15T12:59:58+5:30
गेल्या काही महिन्यांपासून डॉ. अजित रानडे यांच्या नियुक्तीवरून वाद सुरू होता.
Dr Ajit Ranade : प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ डॉ.अजित रानडे यांची 'गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स' पुणेच्या कुलगुरू पदावरून हकालपट्टी करण्यात आली. अर्थतज्ज्ञ आणि राजकीय विश्लेषक डॉ. अजित रानडे यांना शनिवारी दुपारी गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सच्या कुलगुरूपदावरून हटवण्यात आलं. अध्यापनाच्या अनुभवाशी संबंधित पात्रता निकषांची पूर्तता केली नसल्याचं कारण देत रानडे यांना दूर करण्यात आलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून डॉ. अजित रानडे यांच्या नियुक्तीवरून वाद सुरू होता. अडीच वर्षाच्या कार्यकाळानंतर रानडे यांची कुलगुरू पदावरुन हकालपट्टी करण्यात आली.
प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ डॉ. अजित रानडे यांची शनिवारी पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सच्या (जीआयपीई) कुलगुरूपदावरून हकालपट्टी करण्यात आली. संस्थेच्या म्हणण्यानुसार रानडे यांची नियुक्ती विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमांचे उल्लंघन करते. रानडे यांच्या नियुक्तीवर प्रश्न उपस्थित झाल्यानंतर गोखले इन्स्टिट्यूटने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन केली होती. संस्थेने रानडे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की समितीचे मत आहे की त्यांची उमेदवारी यूजीसीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार विहित निकषांशी जुळत नाही, म्हणून त्यांना या पदावरून हटवण्यात येत आहे. या निर्णयावर प्रतिक्रिया देताना रानडे यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, हा खरोखरच दुर्दैवी आणि धक्कादायक निर्णय आहे.
पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स ही भारतातील सर्वात जुनी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था आहे. कुलपती बिवेक देबरॉय यांनी स्थापन केलेल्या वस्तुस्थिती शोध समितीनुसार, रानडे हे प्राध्यापक म्हणून १० वर्षांच्या अध्यापनाच्या अनुभवाचे निकष पूर्ण करत नाहीत. रानडे यांना लिहिलेल्या पत्रात देबरॉय यांनी म्हटलं की, त्यामुळे तुम्हाला तातडीने पदावरून हटवण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नाही.
देबरॉय यांच्या पत्रावर डॉ. रानडे यांनी प्रतिक्रिया दिली. "गेली अडीच वर्षे मी पूर्ण निष्ठेने आणि माझ्या क्षमतेनुसार काम करत आहे. संस्थेच्या सकारात्मक विकासासाठी हातभार लावत आहे. पण माझ्या या कामांकडे पूर्णत: दुर्लक्ष झाल्याचे दिसते," असं डॉ. अजित रानडे यांनी म्हटलं.