घरे अतिक्रमणांच्या कचाट्यात, वसई विरार महानगरातील वास्तव
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2019 03:03 AM2019-02-05T03:03:08+5:302019-02-05T03:03:21+5:30
वसई विरार शहर महानगपालिकेच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात इमारतींचे बांधकाम राखीव असलेल्या भूखंडावर अनिधकृतपणे बिनधास्त केले गेल्याचे समोर आले आहे.
नालासोपारा - वसई विरार शहर महानगपालिकेच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात इमारतींचे बांधकाम राखीव असलेल्या भूखंडावर अनिधकृतपणे बिनधास्त केले गेल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या आकडेवारीनुसार वसई विभागामध्ये ५०.६९ टक्के, नालासोपारा विभागामध्ये ७७.३७ टक्के तर विरार विभागामध्ये ३०.४५ टक्के राखीव भूखंडांवर अनधिकृत इमारती किंवा कब्जा करण्यात आलेला आहे. या आरक्षित भूखंडावर शाळा, क्रीडांगण, उद्यान, पोलीस स्टेशन, डंपिंग ग्राऊंड, बफर झोन ठेवण्यात आलेले आहे.
वसई विरार मनपाच्या ९ प्रभागातील राखीव ठेवण्यात आलेल्या भूखंडावर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम झाल्याचे समोर निदर्शनास आले आहे.ही सर्व माहिती भाजपाचे नालासोपारा शहर उपाध्यक्ष राकेश सिंह यांनी माहिती अधिकारात मागवली आहे. लोकांनी मोठं मोठी स्वप्ने बघून हक्काची घरे विकत घेतली आहेत मात्र त्यांना लागणाऱ्या सुविधा या कायद्याच्या कचाट्यात सापडल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार मनपाच्या प्रभाग ‘बी’ मध्ये सर्वाधिक म्हणजेच ९०.६७ टक्के राखीव भूखंडावर अनधिकृत बांधकामे झालेली आहेत तर प्रभाग ‘सी’ मध्ये सगळ्यात कमी म्हणजेच २९.८९ टक्के राखीव भूखंडावर अनधिकृत बांधकामे झालेली आहेत. मनपाच्या नऊ प्रभागात अनुक्र मे ‘ए’ मध्ये ३०.८९ टक्के, प्रभाग बी मध्ये ९०.६७ टक्के, प्रभाग सी मध्ये २९.८९ टक्के, प्रभाग डी मध्ये ८७.९६ टक्के, प्रभाग ई मध्ये ६५.९६ टक्के, प्रभाग एफ मध्ये ८७.५ टक्के, प्रभाग जी मध्ये ४६.४७ टक्के, प्रभाग एच मध्ये ६३.७२ टक्के आणि प्रभाग आई मध्ये ३५.७९ टक्के राखीव भूखंडावर अनिधकृत बांधकामे झालेली आहेत. तर सध्या ५ टक्के राखीव भूखंडावर अनिधकृत बांधकामे सुरू आहे. वसई विरार मनपाच्या हद्दीत भूमाफिया कोणालाही न जुमानता, मनपाच्या अधिकाºयांशी साटेलोटे करून बिनधास्त अनिधकृत बांधकामे करतात असे अनेक ठिकाणी निदर्शनास आले आहे.
काही अनधिकृत बांधकामे नाल्यावर किंवा नाले बुजवून सुद्धा केलेली आहे. राखीव भूखंडावरील अनधिकृत बांधकामामुळे पोलीस स्टेशन व चौक्या, वसई विरार मधील आरटीओ कार्यालय आणि बस डेपो अशा प्रशासकीय कार्यालयांना जागेकरिता अच्छे दिनाची वाट पाहावी लागणार आहे. मनपाच्या सर्व प्रभागातील हद्दीमधील ५१ मार्केट झोन देखील या अतिक्रमणांपासून वाचलेले नाहीत. मनपा आयुक्तांनी वाढती लोकसंख्या आणि प्रशासकीय अधिकाºयाची कमतरता असल्याचे कारण देत आपला पल्ला झाडला आहे तर विविध प्रभागात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामावर दररोज कारवाई केली जात असल्याचे मनपाकडून सांगण्यात आले आहे.
राखीव भूखंडची माहिती देणारे बोर्ड धूळ खातायेत
वसई विरार मनपाच्या प्रभागात भ्रष्टाचार इतका वाढला आहे की, राखीव भूखंडाच्या बाबत माहिती सांगण्यासाठी बनविण्यात आलेले बोर्ड प्रभागाच्या वॉर्ड आॅफिसच्या परिसरात गंजून भंगार स्थितीत आहेत.
राखीव भूखंडाकडे मनपाने लक्ष न देता जाणीवपूर्वक काणाडोळा केला तर अधिकाºयांनी आर्थिक साटेलोटे करून मदत केल्याने हे भूखंड भूमाफियांच्या घशात गेल्याचा आरोप होतो आहे. तर दुसरीकडे राखीव भूखंडावर भूमाफियांनी
कब्जा करून अनधिकृत इमारती उभ्या केल्याने खेळाची मैदाने, गार्डन, हॉस्पिटल, मार्केट, शाळा हे कागदावरच राहिले
आहे.
राखीव भूखंडावर अनधिकृत बांधकामे सुरू असतांनाच मनपाने कारवाई करण्याची हिम्मत दाखवली असती तर खेळण्यासाठी मैदाने, शाळा, हॉस्पिटल, मार्केट यांचे भूखंड माफियांच्या घशात गेले नसते.
- राकेश सिंग, उपाध्यक्ष, नालासोपारा शहर, भाजपा
कोणत्या राखीव भूखंडावर अनधिकृत बांधकामे आहेत ते दाखवून द्या. त्यांच्यावर रोज कारवाई करून ती तोडली जात आहेत.
- सतिश लोखंडे, आयुक्त, वसई विरार महानगरपालिका