वाळूमाफियाकडून ग्रामस्थाचा बळी
By admin | Published: April 17, 2015 11:22 PM2015-04-17T23:22:58+5:302015-04-17T23:22:58+5:30
येथील तरुण नीलेश भोंगळे (वय २२) या तरुणाने विष पिऊन आत्महत्या केली असल्याची घटना उंडवडी (ता. दौंड) येथे घडली
राहू : वाळूवाहतुकीसाठी दिलेल्या रस्त्याचे पैसे मागण्यासाठी गेलेल्या तरुणाला वाळूमाफियांनी बेदम मारहाण केल्याने येथील तरुण नीलेश भोंगळे (वय २२) या तरुणाने विष पिऊन आत्महत्या केली असल्याची घटना उंडवडी (ता. दौंड) येथे घडली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. नीलेश याला बुधवारी मारहाण करण्यात आली, तर त्याने गुरुवारी आत्महत्या केली आहे.
याबाबत खरी तक्रार घेण्यास यवत पोलिसांकडून राजकीय दबावापोटी टाळाटाळ करण्यात येत असल्याचे ग्रामस्थांच्या वतीने सांगण्यात आले. या संदर्भात यवत पोलिसांनी सदर युवकाने विष घेऊन आत्महत्या केली असल्याची नोंद केली आहे. काही दिवसांपूर्वी राहूबेट परिसरातील अनेक वाळू भूखंडांचे लिलाव करण्यात आले आहेत. पैकी उंडवडी (ता. दौंड) येथील वाळूचा लिलाव एका बड्या ठेकेदाराने घेतला असून, वाळूची वाहतूक करण्यासाठी नदीशेजारील शेतकरी संपत भोंगळे यांच्या शेतजमिनीतून रस्ता भाडेतत्त्वावर दोन लाख रुपये किमतीला घेण्यात आला. पैकी काही रक्कम संबंधित शेतकऱ्याला दिली. काही रकमेचा धनादेशही दिला होता; मात्र हा धनादेश बँकेत घेऊन गेल्यावर त्या खात्यात रक्कम शिल्लक नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संपत भोंगळे यांचा मुलगा नीलेश संपत भोंगळे (वय २२) याने आपल्या शेतामध्ये जाऊन व्यवहाराप्रमाणे पैसे द्यायचे नसतील, तर तुमचा रस्ता बंद करू किवा आमची उर्वरित रक्कम द्या, असे सांगितले. यावरून नीलेश व ठेकेदार यांच्यात चांगलीच बाचाबाची झाली.
त्यानंतर ठेकेदार व त्याच्यासोबतच्या लोकांनी नीलेश याला शिवीगाळ करून बेदम मारहाण केली. आपल्या शेतातून रस्ता घेऊन हे लोक आपल्यालाच मारहाण करतात, याचा राग मनात धरून नीलेशने शेती उपयोगी कीटकनाशक पिऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे उंडवडी परिसरावर शोककळा पसरली आहे.
याबाबतची तक्रार यवत पोलीस ठाण्यात नोंदविण्यास पोलिसांकडून राजकीय दबावापोटी टाळाटाळ करण्यात येत असल्याचे नीलेश यांच्या घरच्यांकडून सांगण्यात येत आहे, तर हा प्रकार मिटविण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला जात असल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (वार्ताहर)