भोरमध्ये रस्त्यावर पडलेल्या झाडाने घेतला तरुणाचा बळी
By admin | Published: October 10, 2016 02:16 AM2016-10-10T02:16:21+5:302016-10-10T02:16:21+5:30
एसटी डेपोजवळ रस्त्यात पडलेल्या झाडाला दुचाकी धडकून झालेल्या अपघातात एक तरुण जागीच ठार व दुसरा गंभीर जखमी झाला आहे
भोर : एसटी डेपोजवळ रस्त्यात पडलेल्या झाडाला दुचाकी धडकून झालेल्या अपघातात एक तरुण जागीच ठार व दुसरा गंभीर जखमी झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे हा अपघात घडला.
राहुल विठ्ठल दूरकर (वय २५, रा. गुठाळे, ता. खंडाळा, सातारा) जागीच ठार झाला. अक्षय विठ्ठल महांगरे गंभीर जखमी झाला आहे. त्याला पुढील उपचारासाठी पुण्याला पाठविण्यात आले आहे.
याबाबतची माहिती अशी, शहरातील भोर-शिरवळ रस्त्यावर एसटी डेपोजवळ भररस्त्यात सकाळी ११ वाजता बाभळीचे झाड पडले. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाने ते काढले नाही.
कोणताच सूचनाफलकही लावला नाही. यामुळे झाडाचा अंदाज न आल्याने पाच ते सहा दुचाकी घसरून अपघात झाले होते. मात्र तरीही प्रशासनाला जाग आली नाही. रात्री अंधारामुळे रस्त्यात पडलेले झाड दिसले नाही. त्यामुळे दुचाकीवरून (एमएच ०६-७९८४) जाणारे अक्षय व राहुल यांची गाडी झाडावर आदळली. दोघेही रस्त्यावर पडले. यात राहुल जागीच ठार झाला. अक्षय गंभीर जखमी झाला. त्याला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र तो गंभीर जखमी असल्याने त्याला उपचारासाठी पुण्याला पाठविण्यात आले. दोघेही गोदरेज कंपनीत कामाला होते.
दरम्यान, अपघातानंतर मृत आणि जखमी तरुणांना रुग्णालयात घेऊन जाण्यास रुग्णवाहिकेवर चालक नसल्याने खासगी गाडीतून रुग्णालयात आणण्यात आले. यातून भोरच्या उपजिल्हा रुग्णालयाचा भोंगळ कारभार दिसून येतो.
(वार्ताहर)