एचआयव्ही बाधित कामगार महिलेला कामगार न्यायालयात दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2018 11:29 AM2018-12-05T11:29:44+5:302018-12-05T11:42:03+5:30
एचआयव्ही बाधित असल्याने तीन वर्षांपूर्वी एका ३२ वर्षीय महिलेला कंपनीने कामावरुन काढून टाकले होते.
पुणे : एचआयव्ही बाधित असल्याने शहरातील एका औषध निर्मिती कंपनीतून कामावरून काढलेल्या महिलेला कामगार न्यायालयात दिलासा मिळाला आहे. संबंधित महिलेला त्वरित कामावर रुजू करून घेत कामावरुन कमी केल्या दिवसापासूनचा पगार तसेच अन्य भत्ते महिलेला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
तीन वर्षांपूर्वी एका ३२ वर्षीय महिलेला कंपनीने कामावरुन काढून टाकले होते. त्यामुळे या प्रकरणी महिलेने कंपनीच्या विरोधात कामगार न्यायालयात दाद मागितली. तिचे वकील अॅड. विशाल जाधव यांच्या मार्फत दावा दाखल केला होता. त्यांनी दिलेल्या लढयाला यश आले असून तक्रारदार एचआयव्ही बाधित महिलेला पुन्हा कामावर रुजू करून घेण्याचे आदेश कामगार न्यायालयाने दिले आहेत. तक्रारदार महिला एका औषधनिर्मिती कंपनीत आॅपरेटर आहे. कंपनीने महिलेकडे वैद्यकीय चाचणी करुन याबाबत अहवाल सादर करण्यास सांगितले होते. वैद्याकीय तपासणीत ती एचआयव्ही बाधित असल्याचे उघड झाले होते. दरम्यान, याबाबतचा अहवाल कंपनीकडे सादर केला. तेव्हा कंपनीने महिला एचआयव्ही बाधित असल्याचे कारण देऊन तिला तडकाफडकी कामावरुन कमी केले होते. दरम्यान, महिलेने स्वेच्छेने राजीनामा दिल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला होता.
तक्रारदार महिला २०१०मध्ये कंपनीत रूजू झाल्या होत्या. उपचारासाठी केलेला खर्च मिळण्यासाठी ४ आॅगस्ट २०१५ रोजी कंपनीकडे वैद्याकीय तपासणी अहवाल सादर केला होता. वैद्याकीय तपासणी अहवालात संबंधित महिला एचआयव्ही बाधित असल्याचे उघडकीस आले होते. त्या दिवशी तिला कंपनीतील वरिष्ठ अधिकाºयांनी राजीनामा देण्याची सूचना केली होती, असे अॅड. जाधव यांनी सांगितले.
कामगार न्यायालयाने कंपनी तसेच तक्रारदार महिलेचे वकील अॅड. जाधव यांची बाजू ऐकून घेतली. त्यानंतर एचआयव्ही बाधित महिलेच्या बाजूने निकाल दिला. कामावरुन कमी केल्या दिवसापासूनचा पगार तसेच अन्य भत्ते महिलेला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.