पाणीटंचाईने घेतला बळी

By admin | Published: March 31, 2016 03:04 AM2016-03-31T03:04:14+5:302016-03-31T03:04:14+5:30

गावाकडे पडलेल्या दुष्काळामुळे पोट ‘जगवण्या’साठी पुण्यामध्ये आलेल्या कुटुंबाची पाण्याची वणवण काही थांबली नाही. पुण्यासारख्या शहरातही पाठी लागलेल्या पाणीटंचाईने शेवटी

Victims of water scarcity | पाणीटंचाईने घेतला बळी

पाणीटंचाईने घेतला बळी

Next

पुणे : गावाकडे पडलेल्या दुष्काळामुळे पोट ‘जगवण्या’साठी पुण्यामध्ये आलेल्या कुटुंबाची पाण्याची वणवण काही थांबली नाही. पुण्यासारख्या शहरातही पाठी लागलेल्या पाणीटंचाईने शेवटी त्यांच्या घरातल्या अवघ्या बारा वर्षांच्या मुलीचा बळी घेतला. पिण्यासाठी पाणी आणायला जात असताना, अज्ञात वाहनाने या मुलीला धडक दिली. या अपघातात तिचा जागीच मृत्यू झाला.
किरण बाळासाहेब मांडे (वय १२, रा. तापकीरचाळ, बाणेर गावठाण) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलीचे नाव आहे. चतु:शृंगी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हवालदार रवींद्र देवरुखकर यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मांडे कुटुंब मूळचे परभणी जिल्ह्यामधले आहे. मागील तीन वर्षांपासून मराठवाड्यामध्ये दुष्काळ आहे. कामधंद्यासाठी दोन वर्षांपूर्वी पुण्यात आलेल्या बाळासाहेब मांडेंचे कुटुंब मोलमजुरी करून जगत होते. बाणेर गावठाणातील तापकीर चाळीमध्ये एका खोलीत हे कुटुंब राहाते. गावाकडे पाणी नसल्यामुळे अडचणींचा सामना करावा लागलेल्या या कुटुंबाला पुण्यातही
पाणीटंचाईच्या झळा बसत होत्या.
मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास किरण पाणी आणण्याकरिता सायकलवरून जात होती. त्या वेळी भरधाव आलेल्या मोटारीने तिला धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या किरणला नागरिकांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, तिचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला होता. अपघात केलेला मोटारचालक गाडीसह पसार झाला. (प्रतिनिधी)

उपनिरीक्षकाला सौजन्याचे वावडे
या अपघाताची माहिती घेण्यासाठी चतु:शृंगी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक एस. बी. बाबर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी यापुढे कोणत्याही गुन्ह्याची माहिती घेण्यासाठी मला फोन करायचा नाही. माहिती प्रेसरूमला पाठवतो, त्यामुळे माहिती त्याठिकाणावरूनच घ्यावी अशी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांना प्रथम संपर्क साधला असता, आपण अद्याप घटनेची कागदपत्रेच पाहिली नसल्याचे उत्तर दिले. एवढ्याशा गुन्ह्याच्या माहितीसाठी आमच्या वरिष्ठांना कशाला फोन करता, असा प्रश्नही त्यांनी केला. एवढा गंभीर गुन्हा घडूनही त्याबाबत असलेली तपास अधिकाऱ्यामधली उदासीनता यानिमित्ताने समोर आली. मृत्युमुखी पडलेल्या मुलीच्या कुटुंबाची माहिती देण्यास चतु:शृंगी पोलिसांनी शेवटपर्यंत टाळाटाळ का केली, हे न उलगडलेले कोडे आहे.

Web Title: Victims of water scarcity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.