महाराष्ट्राचा विजयी समारोप!, आसामवर ७ गडी राखून मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 04:35 AM2017-11-28T04:35:40+5:302017-11-28T04:35:45+5:30

रणजी चषक क्रिकेट स्पर्धेत बाद फेरीच्या शर्यतीतून आधीच बाहेर पडलेल्या महाराष्ट्राने आपल्या अखेरच्या साखळी लढतीत आसामला ७ गडी राखून लोळवीत या मोसमाचा विजयी समारोप केला.

 The victory of Maharashtra, conquest Assam by 7 wickets | महाराष्ट्राचा विजयी समारोप!, आसामवर ७ गडी राखून मात

महाराष्ट्राचा विजयी समारोप!, आसामवर ७ गडी राखून मात

Next

पुणे : रणजी चषक क्रिकेट स्पर्धेत बाद फेरीच्या शर्यतीतून आधीच बाहेर पडलेल्या महाराष्ट्राने आपल्या अखेरच्या साखळी लढतीत आसामला ७ गडी राखून लोळवीत या मोसमाचा विजयी समारोप केला. पहिल्या डावात २६ धावांनी माघारूनदेखील दुसºया डावात प्रदीप दाढे (५१ धावांत ५ बळी) आणि निकित धुमाळ (४८ धावांत ४ बळी) यांच्या भेदक गोलंदाजीनंतर नौशाद शेख याने झळकावलेले नाबाद आक्रमक शतक या जोरावर सोमवारी, सामन्याच्या तिसºयाच दिवशी बाजी मारली. १०५ चेंडूंत २० खणखणीत चौकारांसह नाबाद १०८ धावांची निर्णायक खेळी साकारणारा नौशाद अर्थातच सामन्याचा मानकरी ठरला.
पूना क्लबच्या मैदानावर ही लढत झाली. घरच्या मैदानावर या स्पर्धेतील आपली अखेरची साखळी लढत खेळत असलेल्या महाराष्ट्राकडून विजयी समारोपाची अपेक्षा होती. आसामच्या पहिल्या डावातील २७९ धावांच्या उत्तरात महाराष्ट्राचा संघ २५३ धावांवर बाद झाला. पहिल्या डावात २६ धावांनी माघारलेल्या महाराष्ट्रासाठी विजय अवघड वाटत होता. मात्र, सांघिक कामगिरीच्या जोरावर या रंगतदार लढतीत महाराष्ट्राने तिसºयाच दिवशी सहज विजय मिळविला. कालच्या ३ बाद १०१ वरून पुढे खेळणाºया आसामचा दुसरा डाव महाराष्ट्राच्या वेगवान गोलंदाजांनी
१८९ धावांत गुंडाळला. दाढे-धुमाळ या पुण्याच्या मध्यमगती गोलंदाजांनी आसामचे उर्वरित ७ फलंदाज ८८ धावांत पॅव्हेलियनमध्ये पाठवीत महाराष्ट्राला विजयाची संधी उपलब्ध करून दिली. विजयासाठी आवश्यक २१६ धावांचे आव्हान महाराष्ट्राने
४७.४ षटकांत अवघ्या ३ फलंदाजांच्या मोबदल्यात पूर्ण
केले. कर्णधार अंकित बावणे याने नाबाद ५२ धावा (७२ चेंडूंत २ षटकार, ५ चौकार) करीत नौशादला मोलाची साथ दिली.
विजयासाठी २१६ धावांचा पाठलाग करणााºया महाराष्ट्राने संथ प्रारंभ केला. २९ चेंडूंत ४ धावा करणाºया चिराग खुराणाला प्रीतम दास याने माघारी धाडत यजमानांना पहिला धक्का दिला. संघाचे अर्धशतक फळ्यावर लागण्यापूर्वीच पहिल्या डावातील शतकवीर ऋतुराज गायकवाडही माघारी परतला. त्याने ३२ चेंडूंत एका चौकारासह १६ धावा केल्या. सलामी जोडी ४९ धावांत बाद झाल्यानंतर आणखी १८ धावांची भर पडत नाही तोच स्थिरावलेला रोहित मोटवानी राहुल सिंगचा बळी ठरला. त्याने ४८ चेंडूंत उपयोगी ३६ धावा करताना ७ चौकार लगावले.
या विजयासह महाराष्ट्राने ६ गुणांची कमाई केली. ‘अ’ गटातून बाद फेरीच्या शर्यतीतून आधीच बाहेर पडलेल्या महाराष्ट्राचे ६ सामन्यांत १६ गुण झाले आहेत. या संघाने २ विजय, २ पराभव, १ अनिर्णीत आणि १ लढत रद्द अशी कामगिरी केली.

गोलंदाजी अन् फलंदाजीतील निर्णायक टप्पे...'

काल एकही गडी बाद करू न शकणाºया २६ वर्षीय निकित धुमाळने आज कमाल केली. त्याने पाहुण्या आसामचे उर्वरित ७ पैकी ४ फलंदाज माघारी धाडत ही लढत जिंकण्याच्या पाहुण्या संघाच्या इराद्यांना सुरूंग लावला. पहिल्या डावात ५ बळी घेणाºया निकितने सामन्यात १४३ धावांमध्ये ९ गडी बाद करण्याचा पराक्रम केला.
काल २ बळी घेणाºया प्रदीप दाढे यानेही प्रभावी मारा करीत आज ३ बळी घेत डावात ५ बळी घेण्याचा पराक्रम केला. २२ वर्षीय प्रदीपची प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एका डावात ५ गडी बाद करण्याची पहिलीच वेळ आहे.
६८ धावांत आघाडीचे ३ फलंदाज गमावले तेव्हा महाराष्ट्राला विजयासाठी आणखी १४८ धावांची गरज होती. सामन्याचा आणखी एक दिवस हाताशी असला तरी गोलंदाजांना साथ देणाºया खेळपट्टीवर अखेरच्या डावात फलंदाजी करणे आव्हानात्मक होते. मात्र, उस्मानाबादचा २६ वर्षीय फलंदाज नौशादचे इरादे वेगळेच होते. काहीशा दबावाच्या परिस्थितीत त्याने जोरदार ‘काऊंटर अटॅक’ करीत महाराष्ट्राला एक वेळ अवघड वाटणारा विजय सहजसाध्य केला.
नौशाद वन-डे स्टाईल फटकेबाजी करीत असताना कर्णधार अंकित बावणे याने दुसरी बाजू लावून धरताना काहीशी संयमी फलंदाजी केली. या दोघांनी नाबाद १४८ धावांची भागीदारी करीत महाराष्ट्राच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. २४ वर्षीय अंकितचे हे २८वे प्रथम श्रेणी अर्धशतक ठरले.

संक्षिप्त धावफलक
आसाम : पहिला डाव : २७९.
महाराष्ट्र : पहिला डाव : २५३.
आसाम : दुसरा डाव : ६३.५ षटकांत सर्व बाद १८९ (रिषव दास ३५, अभिषेक ठाकुराई ३५, पल्लवकुमार दास २६, प्रदीप दाढे ५/५१, निकित धुमाळ ४/४८, राहुल त्रिपाठी १/१४).
महाराष्ट्र : दुसरा डाव : ४७.३ षटकांत ३ बाद २१६ (नौशाद शेख नाबाद १०८, अंकित बावणे नाबाद ५२, रोहित मोटवानी ३६, ऋतुराज गायकवाड १६, चिराग खुराणा ४, रजत खान १/३१, प्रीतम दास १/४३, राहुलसिंग १/५८).

Web Title:  The victory of Maharashtra, conquest Assam by 7 wickets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.