विदर्भाने गाठली चाळिशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:12 AM2021-03-08T04:12:25+5:302021-03-08T04:12:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : मार्च महिना सुरू झाल्यानंतर, आता उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली असून, राज्यातील बहुतांश भागातील कमाल ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : मार्च महिना सुरू झाल्यानंतर, आता उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली असून, राज्यातील बहुतांश भागातील कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत वाढले आहे. विदर्भाने आताच चाळिशी ओलांडली आहे. राज्यात रविवारी सर्वाधिक कमाल तापमान अकोला येथे ४०.१ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले आहे. सर्वांत कमी किमान तापमान जळगाव येथे १४. २ अंश नोंदविले गेले असून, ते सरासरीच्या तुलनेत ३.१ अंशाने घटले आहे.
विदर्भातील बहुतांश भागात कमाल तापमानाचा पारा वाढता राहिला आहे. कोकण, गोव्याच्या तुरळक भागातही कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या बऱ्याच भागात कमाल तापमानात किंचित वाढ झाली आहे.
मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. विदर्भाच्या बऱ्याच भागात किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते.
राज्यात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.
........
विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली,गोंदिया जिल्ह्यातील तुरळक भागात १० व ११ मार्च रोजी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
.......
पुणे शहरात ९ व १० मार्च रोजी दुपारनंतर आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. कमाल तापमान ३७ अंश आणि किमान तापमान १६ अंश सेल्सिअसच्या जवळपास राहण्याची शक्यता आहे.
.....
राज्यातील प्रमुख शहरांतील कमाल तापमान (अंश सेल्सिअस) पुणे ३६.४, लोहगाव ३६.५, कोल्हापूर ३५.६, महाबळेश्वर ३०.८, मालेगाव ३८.६, नाशिक ३४.१, सांगली ३७.२, सातारा ३६.५, सोलापूर ३८.२, मुंबई ३२.२, सांताक्रुझ ३५.६, अलिबाग ३१.७, रत्नागिरी ३३, पणजी ३२.४, डहाणु ३२.२, औरंगाबाद ३६.४, परभणी ३७.८, नांदेड ३७, अकोला ४०.१, अमरावती ३८, बुलढाणा ३७.८, गोंदिया ३६.२, नागपूर ३८.३, वर्धा ३८.५.