Video : अमित शहा पुण्यात, श्रीमंत दगडूशेठ गणपतीची आरती अन् प्रार्थना
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2021 12:04 PM2021-12-19T12:04:13+5:302021-12-19T12:05:56+5:30
राज्यात लवकरच महापालिका निवडणुकांचे रणशिंग फुंकले जाणार आहे. सध्या पुणे महापालिकेत भाजपची सत्ता आहे, त्यामुळे ही सत्ता टिकवण्यासाठी भाजपकडून कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
पुणे - गृहमंत्री अमित शाह आज पुण्याच्या दौऱ्यावर असून सकाळीच त्यांनी पुण्यातील मानाचा गणपती आणि आराध्य दैवत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले. अहमदनगरमधील सहकार दौरा संपवून त्यांनी पुण्यात कार्यक्रम घेतले आहेत. सहकार मंत्री झाल्यापासून शहा यांचा हा पहिलाच महाराष्ट्रातील दौरा आहे. त्यामुळे या दौऱ्याकडे महाराष्ट्राचे विशेष लक्ष लागले आहे. शहा यांनी आज पुणे येथे आज श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात आरती केली.
राज्यात लवकरच महापालिका निवडणुकांचे रणशिंग फुंकले जाणार आहे. सध्या पुणे महापालिकेत भाजपची सत्ता आहे, त्यामुळे ही सत्ता टिकवण्यासाठी भाजपकडून कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला आज अमित शहा आवर्जून उपस्थिती लावणार आहेत. तसेच, पुण्यातील विविध कार्यक्रमात हजर राहून भाजप कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्याचं कामही त्यांच्या माध्यमातून होत आहे.
पुणे - गृहमंत्री अमित शाह यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेश मंदिरात केली आरती, घेतले बाप्पांचे दर्शन pic.twitter.com/ASqepZVh6P
— Lokmat (@lokmat) December 19, 2021
अहमदनगर येथे शनिवारी शहा यांच्या उपस्थितीत सहकार परिषदेचे आणि शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस अध्यक्षस्थानी होते. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, मंत्री डॉ. भागवत कराड, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह दिग्गज नेते व्यासपीठावर होते.
पुण्यात कडक बंदोबस्त
केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री अमित शहा हे दोन दिवसाच्या पुणे दौऱ्यावर आले असून त्यामुळे शहरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. देशाच्या सहकार मंत्रिपदी निवड झाल्यानंतर अमित शहा पहिल्यांदाच पुण्यात येत असल्याने शहर भाजपने त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे. अमित शहा शहरातील विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. त्या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी स्थानिक पोलीस ठाण्याचा बंदोबस्त असून गुन्हे शाखा, विशेष शाखा यांचा स्वतंत्र बंदोबस्त नेण्यात आला आहे. साध्या वेशातील पथके शहरात तैनात करण्यात आली आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकारी या बंदोबस्तावर लक्ष ठेवून आहेत. शहा यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेली केंद्रीय सुरक्षा बलाची पथकेही शहरात दाखल झाली आहेत. शनिवारी सायंकाळी या बंदोबस्ताची रंगीत तालीम घेण्यात आली.
सहकार विद्यापीठ स्थापन करण्याचे धोरण
सहकाराबाबत विद्यापीठ स्थापन करण्याचे केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे, असेही शहा यांनी सांगितले. प्रवरानगर येथे पद्मश्री विठ्ठलराव विखे, धनंजयराव गाडगीळ, वैकुंठभाई मेहता यांनी पहिला सहकारी साखर कारखाना उभारला. येथील मातीवर सर्वांनी माथा टेकविला पाहिजे, असे गौरवोद्गार शहा यांनी काढले.