Video : पुणे पोलिसांवर गाझियाबादमध्ये हल्ला; स्थानिकांकडून पोलिसांना मारहाण, मोटारीची तोडफोड
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 06:22 PM2021-05-11T18:22:18+5:302021-05-11T18:25:04+5:30
पोलीस हवालदाराच्या खून प्रकरणातील संशयित महिलेला पकडण्यासाठी गाझियाबाद येथे गेलेल्या पुणे पोलिसांच्या पथकावर स्थानिकांचा हल्ला; व्हिडिओ व्हायरल....
पुणे : बुधवार पेठेतील पोलीस हवालदाराच्या खून प्रकरणातील संशयित महिलेला पकडण्यासाठी उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे गेलेल्या पुणेपोलिसांच्या पथकावर स्थानिकांनी हल्ला केला आहे. यात पोलिसांच्या गाडीवर तुफान दगडफेक करुन तिची तोडफोड करण्यात आली. ही घटना सोमवारी सकाळी घडली आहे. इतके सर्व झाल्यानंतरही पुणे पोलिसांनी हिंमत न हारता संशयित महिलेला ताब्यात घेतले असून हे पथक आता पुण्याकडे निघाले आहे.
या तोडफोडीचा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यात तेथील तरुण पुणे पासिंग असलेल्या गाडीची तोडफोड करीत असल्याचे दिसत आहे.
गेल्या आठवड्यात ५ मे रोजी बुधवार पेठेत मध्यरात्री तडीपार गुंड प्रवीण महाजन याने पोलीस हवालदार समीर सय्यद याचा खून केला होता. या प्रकरणातील संशयित महिला प्रवीण महाजनबरोबर होती. तिचा पोलीस शोध घेत होते. ही महिला गाझियाबादला पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार फरासखाना पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अभिजित पाटील व ४ पोलीस सहकारी हे खासगी गाडीने गाझियाबाद येथे गेले होते. हे पोलीस पथक तेथे गेल्यावर स्थानिकांनी त्यांना विरोध करत मारहाण करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर दगडफेक केली. त्यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली.
गाझियाबादमध्ये पुणे पोलिसांवर हल्ला; स्थानिकांकडून पोलिसांना मारहाण, मोटारीची तोडफोड https://t.co/CbvSFUjpi9pic.twitter.com/gALjtMeu4m
— Lokmat (@MiLOKMAT) May 11, 2021
याबाबत फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांनी सांगितले की, फरासखाना पोलीस ठाण्याचे पथक गाझियाबादला गेले आहे. त्यांच्या गाडीवर स्थानिकांनी दगडफेक केली आहे. मात्र, कोणीही अधिकारी अथवा कर्मचारी जखमी झालेले नाही. ज्या कामासाठी ते गेले होते. त्या महिलेला त्यांनी ताब्यात घेतले असून तिला घेऊन ते पुण्याकडे निघाले आहेत. उद्या पुण्यात पोहचतील. या घटनेबाबत स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात येणार आहे.
एक अधिकारी आणि पाच कर्मचारी बुधवार पेठेतील पोलीस हवालदाराच्या खून प्रकरणाच्या तपासासाठी उत्तरप्रदेश येथील गाझियाबाद येथे गेले होते.त्या ठिकाणी या खुनातील एक महिला असल्याचा संशय होता. तिला पकडण्यासाठी तिथे गेले असता हा प्रकार घडला. पोलीस याबाबत गुन्हा दाखल करणार करणार आहे. प्रियांका नारनवरे,पोलीस उपायुक्त.