Video: भाजप आमदार महेश लांडगे यांना हलगीच्या तालावरचा 'ठेका' भोवला; भोसरीत त्यांच्यासह ६० जणांविरोधात गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 05:57 PM2021-05-31T17:57:55+5:302021-05-31T18:07:31+5:30

मुलगी साक्षीच्या मांडव डहाळ्याच्या कार्यक्रमात राजकीय कार्यकर्त्यांसहचा डान्स सोशल मीडियात व्हायरल.....

Video: BJP MLA Mahesh Landage's 'dance' viral on social media; Crime against 60 people including him in Bhosari | Video: भाजप आमदार महेश लांडगे यांना हलगीच्या तालावरचा 'ठेका' भोवला; भोसरीत त्यांच्यासह ६० जणांविरोधात गुन्हा

Video: भाजप आमदार महेश लांडगे यांना हलगीच्या तालावरचा 'ठेका' भोवला; भोसरीत त्यांच्यासह ६० जणांविरोधात गुन्हा

Next

पिंपरी : भाजपचे भोसरी येथील आमदार महेश लांडगे यांनी मुलीच्या लग्नाच्या मांडव डहाळे कार्यक्रमात ठेका धरला. आमदार लांडगे नाचत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला. त्यानंतर त्यांच्यासह इतर ६० जणांच्या विरोधात भोसरी पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. ३१) गुन्हा दाखल करण्यात आला.

आमदार महेश किसनराव लांडगे, सचिन किसनराव लांडगे, अजित सस्ते, कुंदन गायकवाड, राहुल लांडगे, दत्ता गव्हाणे, गोपी कृष्ण धावडे, सुनील लांडे, नितीन गोडसे, प्रज्योत फुगे (सर्व रा. भोसरी) यांच्यासह इतर सुमारे ४० ते ५० जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस कर्मचारी सुरेश नानासो वाघमोडे (वय ३२) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांची मुलगी हिच्या लग्नाचा मांडव डहाळे कार्यक्रम भोसरी येथे रविवारी (दि. ३०) सायंकाळी साडेसहा ते रात्री साडेनऊ दरम्यान झाला. लांडगेआळी, भोसरी येथे आमदार महेश लांडगे यांच्या घरासमोर त्यांचे भाऊ सचिन किसनराव लांडगे यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी आमदार लांडगे, अजित सस्ते व इतर सुमारे ४० ते ५० अनोळखी लोकांनी परवानगी नसताना बेकायदेशीररित्या एकत्र आले. फिजिकल डिस्टन्स न पाळता तसेच विनामास्क या कार्यक्रमात नाचगाणे करून वाद्ये वाजवली. कोरोना विषाणूंचा आणखी प्रसार होईल व लोकांच्या जिवितास धोका होईल, असे कृत्य करून तसेच जाणीवपूर्वक जमाव करून शासनाच्या व प्रशासनाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करून नियमांचे उल्लंघन केले.

आमदार महेश लांडगे हे भाजपाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्या निकटवर्तीयांना तसेच नातेवाईकांना कोरोना विषाणूंचा संसर्ग झाला होता. यात काही जण दगावले. तसेच शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने आमदार लांडगे यांनी सोशल मीडियातून हतबल होत दु:ख व्यक्त केले होते. तसेच शहरातील कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा होत नसल्याचे सांगत त्यांनी संताप व्यक्त केला होता. कोरोना रोखण्यासाठी शासनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले होते. मात्र नियम उल्लंघन केल्याने त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे.

Web Title: Video: BJP MLA Mahesh Landage's 'dance' viral on social media; Crime against 60 people including him in Bhosari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.