Video: अतिदक्षता विभागात कोरोना रुग्णाची 'कलाकारी' ; बासरीच्या सूरांनी वातावरण केले एकदम 'टेन्शन फ्री'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2021 11:30 AM2021-04-21T11:30:39+5:302021-04-21T11:41:39+5:30
अतिदक्षता विभाग म्हटलं की, फक्त मॉनिटर्सचे आवाज , प्राणवायू मिळवण्यासाठी रुग्णांची चाललेली धडपड, डॉक्टरांची रुग्णांना वाचवण्यासाठी चाललेली प्रयत्नांची पराकाष्ठा हेच चित्र डोळ्यापुढे येते...
पांडुरंग मरगजे -
पुणे : कोरोनाच्या वाढत्या उद्रेकामुळे हल्ली रस्त्यावरच्या भयाण शांततेत फक्त रुग्णवाहिकेच्या सायरन चा आवाज कानावर पडतोय. तसेच रुग्णालयातील अवस्था पाहून काळजात एकदम धस्सं होतं. त्यात अतिदक्षता विभाग म्हटलं विचारायलाच नको. पण जर कोरोना बाधितांवर उपचार करणाऱ्या अतिदक्षता विभागात बासरीचे मंजूळ स्वर कानावर पडले तर आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.पण पुण्यातील एका कोरोना बाधिताने अतिदक्षता विभागात बासरीच्या अनवट स्वरातून 'जीवन गाणे गातच राहावे' या गाण्याचे सूर असे काही छेडले की टेन्शनचं वातावरणात एकदमच आनंद, चैतन्याने भारावून गेले.
अतिदक्षता विभागात बासरीचे स्वर छेडणाऱ्या कलाकाराचे नाव आहे पोपट कुंभार.. त्यांच्यावर एकीकडे कोरोनाचे उपचार सुरू होते. परंतु त्यांनी याही परिस्थितीमध्ये बासरीवर सूर छेडले आणि 'जीवन गाणे गातच रहावे' हा संदेश कोरोनाग्रस्त रुग्णांना दिला. हल्ली 'कोरोना' आणि 'मृत्यूचं भय' हे दोन शब्द 'समानार्थी' झाले आहेत. परंतु कोरोनाचे भय बाळगण्यापेक्षा हिंमतीने त्याचा सामना केला आणि त्यासाठी कुटुंब, मित्र व डाॅक्टरांची वेळीच साथ लाभली तर अतिदक्षता विभागात दाखल केलेली कोरोनाग्रस्त ज्येष्ठ व्यक्तीसुद्धा कोरोनावर मात करू शकते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे पोपट नामदेव कुंभार आहे.
यासंदर्भात 'लोकमत' शी बोलताना महेंद्र कोंढरे म्हणाले, मारुती कुंभार यांचे वडील पोपट कुंभार यांची कोविड १९ टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्यातच त्यांना न्यूमोनिया असल्याने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतू, त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा न होता प्रकृती अजूनही खालावत गेली. इन्फेक्शन खूप वाढले. त्यामुळे चिंताग्रस्त झालेले मारुती नगरसेविका स्मिता कोंढरे यांच्या जनसंपर्क कार्यालयात आले. त्यांनी सामाजिक कार्यकर्ते सुधीर कोंढरे यांना घाबरलेल्या अवस्थेत सांगितले, की "काही पण करा... पण माझ्या वडिलांचे प्राण वाचवा." कोंढरे यांनी मारुती याला धीर दिला, व धायरी येथील खासगी रुग्णालयात (सिल्व्हर बर्च हॉस्पिटलचे संचालक डॉ. वैभव पाटील) संपर्क साधून बेड उपलब्ध करून देण्याची विनंती केली. बेड उपलब्ध होताच मारुती कुंभार यांच्या वडिलांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले.
अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना कोरोना रुग्णाची 'कलाकारी';; टेन्शनच्या जगात बासरीच्या सुरांनी बरसल्या आनंदाच्या सरी https://t.co/CbvSFUjpi9pic.twitter.com/cvDmvacne4
— Lokmat (@MiLOKMAT) April 21, 2021
दरम्यान अतिदक्षता विभाग म्हटल की फक्त मॉनिटर्सचे आवाज , प्राणवायू मिळवण्यासाठी रुग्णांची चाललेली धडपड, डॉक्टरांची रुग्णांना वाचवण्यासाठी चाललेली प्रयत्नांची पराकाष्ठा हेच चित्र डोळ्यापुढे येते. पण या रुग्णालयात (सिल्व्हर बर्च हॉस्पिटल) अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर असलेल्या आणि कोविड पाॅझिटिव्ह निदान झालेल्या पोपट कुंभार यांनी उपचारातून फुरसत मिळताच बासुरीवर अनवट सूर छेडले आणि रुग्णालयातील वातावरण उत्साही झाले, तणाव कमी झाला आणि इतर रुग्णांच्या मनातील भीती नाहीशी झाली. कुंभार यांच्या बासुरीच्या सुराने जणू हेच सांगितले की, योग्य उपचार मिळाली तर अतिदक्षता विभाग सुध्दा सूरमयी होऊन जाते. यासाठी महत्वाचे असते ते म्हणजे 'योग्य वेळी योग्य उपचार मिळणे'. या रुग्णालयात कुंभार यांना तत्पर आणि सुयोग्य उपचार मिळाले. आणि त्यांनी कोरोनावर यशस्वी मात केली.