Video: लाडक्या लेकीचं 'लय भारी' स्वागत, गावच्या वावरात अवतरलं हेलिकॉप्टर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2022 02:40 PM2022-04-06T14:40:16+5:302022-04-06T14:41:03+5:30
एकीकडे स्त्री भ्रूण हत्येची समस्या असून मुलगा हा वंशाचा दिवा समजला जातो.
पुणे - मुलगी म्हणजे घरची लक्ष्मी, त्यामुळेच मुलीच्या जन्माचे स्वागतही लक्ष्मीच्या आगमानाप्रमाणे काही कुटुंबात करण्यात येते. त्यातच, घरात अनेक वर्षानंतर किंवा पहल्यांदाच मुलगी जन्माला आली असल्यास कुटुंबीयांच्या आनंदाला पारावार उरत नाही. पुण्याच्या खेड तालुक्यातील शेल पिंपळगाव येथे मुलीच्या जन्माचे अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. यापूर्वी आपण नवरीची पाठवणी हेलिकॉप्टरमध्ये केल्याचं पाहिलं. पण, चक्क स्त्रीजन्माचे स्वागत हेलिकॉप्टरने केल्याने झरेकर कुटंबीय चर्चेचा विषय ठरलं आहे.
एकीकडे स्त्री भ्रूण हत्येची समस्या असून मुलगा हा वंशाचा दिवा समजला जातो. परंतु, झरेकर कुटुंबियांनी मुलगी हीच आपल्या वंशाचा दिवा, मुलगी हीच घरची लक्ष्मी मानत तिच्या जन्माचे जंगी स्वागत केले आहे. या स्वागताने गावातील सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. विशेष म्हणजे त्यांनी आपल्या मुलीचं नावही राजलक्ष्मी असे ठेवले आहे.
22 जानेवारी रोजी भोसरी येथे मुलीच्या आईच्या घरी झाला तिचा जन्म झाला. मात्र, बाळाला खेडमधील शेलगाव येथे तिच्या घरी नेण्यासाठी हेलिकॉप्टर मागविण्यात आले. "आमच्या संपूर्ण कुटुंबात एकही मुलगी नव्हती. त्यामुळे, आमच्या मुलीचे स्वागत विशेष करण्यासाठी आम्ही 1 लाख रुपयांच्या चॉपर राइडची व्यवस्था केल्याचं,” मुलीचे वडिल विशाल झरेकर यांनी सांगितलं. विशाल हे व्यवसायाने वकील आहेत.
"आमच्या घरात खूप दिवसांनी मुलीचा जन्म झाला आणि त्यामुळे अत्यंत आनंद झाला आहे. म्हणून मी आणि माझ्या पत्नीने, लेक राजलक्ष्मीला 2 एप्रिल रोजी हेलिकॉप्टरने घरी आणले. आम्ही देवाचा आशीर्वाद घेण्यासाठी जेजुरीला गेलो. पण, तेथे हेलिकॉप्टर नेण्यास परवानगी नसल्याने, आम्ही आकाशातून प्रार्थना केली," असेही विशाल यांनी सांगितले.
To make our daughter's homecoming special, we arranged a chopper ride worth Rs 1 lakh. We did not have a girl child in our entire family, said the father
— ANI (@ANI) April 5, 2022
(Pic source: Family) pic.twitter.com/K3Pd4rSkbL
गावात हेलिकॉप्टरचे आगमन होताच ग्रामस्थांनी पाहायला गर्दी केली होती. तर, स्त्रीजन्माचे असे अनोख्या पद्धतीने झालेलं स्वागत पाहून गावकरी भारावून गेले. विशेष म्हणजे गुलाब फुलांच्या पाखळ्यांनी तिचं घरात स्वागत करण्यात आलं. यावेळी, मिठाईही वाटून आनंद साजरा केला.