Video: विठूनामाच्या गजरात देहूनगरी दुमदुमली; तुकाराम बीज सोहळ्यासाठी राज्यभरातून हजारो भाविक दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2022 12:52 PM2022-03-20T12:52:21+5:302022-03-20T17:54:57+5:30
संत तुकाराम महाराजांच्या ३७४ वा बीज सोहळ्यासाठी देहूत राज्याच्या विविध कानाकोपऱ्यांतून हजारो भाविक आणि दिंड्या घेऊन देहूत दाखल झाल्याचे दिसून आले आहे
देहूगाव : कोरोनाचे संकट कमी झाल्यानंतर दोन वर्षांनी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचा ३७४ वा बीजोत्सव अर्थात तुकाराम बीज सोहळा झाला. श्रीक्षेत्र देहूनगरीत इंद्रायणी तिरी रविवारी रणरणत्या उन्हाची तमा न बाळगता लक्ष-लक्ष नेत्रांनी हा बीज सोहळा अनुभवला. नांदुरकीच्या झाडावर पाने-फुले व तुळशीची पाने, बुक्का यांची उधळण करून ‘याची डोळा, याची देही’ पाहायला मिळाल्याने भाविकांच्या चेहऱ्यांवर चैतन्य दिसून आले.
श्री संत तुकाराम महाराज बीज सोहळ्याची सुरूवात पहाटे तीन वाजल्यापासून काकड आरतीने झाली. संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे व विश्वस्त यांनी काकड आरती केली. काकड आरतीनंतर देवस्थान विश्वस्तांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. मंदिराच्या गाभाऱ्यात, मंडपात, प्रवेशद्वारात आणि गोपाळपुरा येथील श्री संत तुकाराम महाराज मंदिर आणि नांदुरकीच्या झाडाखालील पारावर फुलांची आकर्षक सजावट व रोषणाई केली होती. या नैमित्तिक महापूजेनंतर भाविकांना मुख्य मंदिरात, शिळा मंदिर व वैकुंठगमन मंदिरात दर्शनाला सोडले. सकाळी मंदिरातील सर्व विधिवत पूजा उरकल्यानंतर साडेदहाच्या सुमारास पालखीचे मानकरी तानाजी कळमकर, कृष्णा पवार, लक्ष्मण पवार, गुंडाजी कांबळे, नामदेव भिंगारदिवे यांनी चोपदार नामदेव गिराम यांच्या सूचनेनंतर पालखी ‘पुंडलिका वरदा हरी विठ्ठल’ नामाचा जयघोष करत वारकऱ्यांसह शिंगाडे, सनई, चौघडा व ताशाच्या गजरात मंदिराच्या महाद्वारातून बाहेर पडली. ती गोपाळपुऱ्याकडे रवाना झाली.
पालखीपुढे परंपरेप्रमाणे संबळ गोंधळी बापू भांडे, चौघडा पिराजी पांडे, शिंगवाले पोपट तांबे, रियाझ मुलाणी यांनी ताशा, आब्दागिरी नितीन अडागळे व भिकाजी साठे गरूडटक्के, ढेरंगे यांनी छत्री, जरीपटका महादेव वाघमारे यांनी आपल्या खांद्यावर घेतल्या होत्या. पालखीपुढे मानकरी कल्याणचे आप्पा महाराज लेले, दिंडीचालक प्रवीण महाराज पद्माकर लेले यांच्या दिंडीसह मोठ्या लवाजम्यासह पालखीचे मुख्य मंदिरातून वैकुंठगमन मंदिराकडे प्रस्थान झाले.
पालखी साडेअकराच्या सुमारास मंदिराच्या आवारात प्रदक्षिणा घालून येथील नांदुरकीच्या झाडाखाली आली. संस्थानचे माजी अध्यक्ष बापू महाराज मोरे देहूकर यांचे सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत परंपरेप्रमाणे ‘‘घोटवीन लाळ, ब्रम्हज्ञानी हाती । मुक्त आत्मस्थिती सोडविन ।।’’ या अभंगावर कीर्तन झाले. दुपारी बारा वाजता ‘बोला पुंडलिका वरदा हरी विठ्ठल’, असा हरिनामाचा गजर करत भाविकांनी येथील नांदुरकीच्या झाडावर पुष्पवृष्टी केली. भाविकांनी दोन्ही हात जोडून बीज सोहळा अनुभवला.
संत तुकाराम महारजांच्याब ३७४ व्या बीज सोहळ्यासाठी हजारो भाविक दाखल (व्हिडिओ - अतुल मारवाडी) #Pune#santtukarampic.twitter.com/sTQrLovOlz
— Lokmat (@lokmat) March 20, 2022