शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातच नेते एकमेकांना भिडले; मशाल रॅलीत काय घडले?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2022 09:58 AM2022-10-12T09:58:53+5:302022-10-12T10:00:51+5:30
पुणे जिल्ह्यातील मंचर येथील घटना...
मंचर (पुणे) : शिवसेनेत दोन गट पडून राज्यात वेगवान राजकीय घडामोडी घडत असतानाच मंचर शहरात मंगळवारी उद्धव ठाकरे गटाच्या मशाल रॅलीत दोन नेत्यांमध्ये फ्रीस्टाइल हाणामारी झाली. जिल्हा संघटक प्रा. राजाराम बाणखेले व माजी सरपंच दत्ता गांजाळे यांनी एकमेकांवर धावून जात अपशब्द वापरले. दोघांच्या या पवित्र्याने मशाल रॅलीतील कार्यकर्ते भांबावले गेले.
शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर सध्या चिन्ह आणि पक्षाचे नवीन नाव याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव मिळाले असून, मशाल चिन्ह मिळाले आहे. मशाल चिन्ह मिळाल्यानंतर ठाकरे गटाने किल्ले शिवनेरी ते मुंबई अशी मशाल रॅली काढली होती. या मशाल रॅलीचे आगमन मंचर शहरात दुपारी झाले.
धर्मवीर संभाजी महाराज चौकातून मशाल रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौकात आली. तेथे स्वागतासाठी थांबलेले जिल्हा संघटक प्रा. राजाराम बाणखेले व माजी सरपंच दत्ता गांजाळे यांच्यात स्वागत करण्यावरून शाब्दिक चकमक होऊन फ्रीस्टाइल हाणामारी झाली. दोघे एकमेकांवर धावून गेले. अगदी हातही उगारले गेले. मात्र, यावेळी हजर असलेले जिल्हा संघटक ॲड. अविनाश राहणे, तालुका प्रमुख दिलीप पवळे व कार्यकर्त्यांनी मध्ये पडत भांडण सोडवले. या भांडणाची चर्चा मात्र तालुक्यात मोठ्या प्रमाणावर सुरू झाली आहे.
एकीकडे शिवसेना पक्षावर वर्चस्व कोणाचे? हे दाखवण्यासाठी शिंदे गट व ठाकरे गट यांच्यामध्ये लढाई सुरू आहे. असे असताना मंचरमध्ये झालेल्या दोन नेत्यांमधील भांडणाची घटना सोशल मीडियात चांगलीच चर्चिली गेली. तसे पाहिले तर बाणखेले व गांजाळे यांचे राजकीय वैर सर्वश्रूत आहे. एकाच पक्षात असताना दोघांनी यापूर्वीही एकमेकांवर आरोप केले आहेत. मात्र, मंगळवारी झालेल्या घटनेने वेगळीच चर्चा सुरू झाली आहे.
मशाल रॅलीत उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांमध्येच धक्काबुक्की#shivsena#Punepic.twitter.com/I7hI70vn6i
— Lokmat (@lokmat) October 12, 2022
याबाबत बोलताना जिल्हा संघटक अविनाश राहणे म्हणाले, मशाल चिन्ह मिळाल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे. स्वागत करताना तू का मी अशी स्पर्धा झाल्याने आजची घटना घडली आहे. पक्ष मोठा झाला की वादविवाद होतात. दत्ता गांजाळे मंगळवारी कार्यक्रमस्थळी आले होते. आम्ही पूर्वीपासून सक्रिय आहोत.
जिल्हा संघटक राजाराम बाणखेले म्हणाले, दत्ता गांजाळे हे पक्षाचे कार्यकर्ते नाहीत. रुबाब करण्यासाठी ते स्वागताला थांबले होते. गांजाळे हे राष्ट्रवादीच्या नेत्यांना भेटून आले आहेत. ते शिंदे गट व भाजपाच्या संपर्कात होते. आमच्या पक्षात काम करायचे नाही. मात्र, घुसखोरी करायची योग्य नाही. गांजाळे हे शिंदे गटाचे असून, चांगल्या कार्यक्रमाचा नाश करण्यासाठी ते स्वागताला आले, असा आरोप बाणखेले यांनी केला.
माजी सरपंच दत्ता गांजाळे म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल नेहमी अनुद्गार काढणाऱ्यांनी मला पक्षनिष्ठा शिकवू नये. राजाराम बाणखेले हे बारा पक्ष फिरून आले आहेत. ते सुपारी बहाद्दर नेते आहेत. राष्ट्रवादीत असताना त्यांनी शिवसेनेची सुपारी घेतली होती. आतासुद्धा शिंदे गटातून सुपारी घेऊन ठाकरे यांचा पक्ष वाढू नये, याचा प्रयत्न ते करत आहेत. मी शिंदे गटात गेलेलो नाही. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना राजकीय संन्यास घेऊ की पक्ष बदलू, असे पत्र मी पाठवले होते. मात्र, मी उद्धव ठाकरे यांच्या गटात असल्याचे गांजाळे यांनी स्पष्ट केले.