Video : महागाईविरुद्ध राष्ट्रवादीचं आंदोलन, चर्चेत आला मुरळीच्या डान्सचा 'गोंधळ'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2021 03:53 PM2021-08-21T15:53:02+5:302021-08-21T15:54:33+5:30
पुण्यातील स्वारगेट चौकातील आंदोलनात जागरण गोंधळ घालण्यात आला होता. या जागरणात मुरळी नाचवल्याने आंदोलनाच्या गोंधळावर टीका होत आहे.
पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसने पेट्रोल, डिझेल दरवाढ आणि घरगुती गॅसच्या दरांत झालेल्या वाढीविरोधात आंदोलन केले. राज्यातील विविध भागात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आंदोलन करत केंद्र सरकारचा निषेध नोंदवला. मात्र, पुण्यातील राष्ट्रवादीच्या आंदोलनात मुरळी नाचवल्याने हे आंदोलन चर्चेचा आणि टीकेचा विषय ठरले आहे. राष्ट्रवादीने महागाईविरुद्ध हे आंदोलन केले आहे.
पुण्यातील स्वारगेट चौकातील आंदोलनात जागरण गोंधळ घालण्यात आला होता. या जागरणात मुरळी नाचवल्याने आंदोलनाच्या गोंधळावर टीका होत आहे. महिलांना अशाप्रकारे आंदोलनात नाचवणे कितपण योग्य, असा प्रश्न विचारला जात आहे. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन या गोंधळाचा व्हिडिओ शेअर केला आहे.
देशात भाजपचं सरकार आल्यापासून प्रत्येक वस्तूच्या किंमतीत दुपटीने वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाची किंमत 100 डॉलर असताना भारतात पेट्रोलचे दर 70 रुपये होते आणि आता आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर 70 रुपये असताना आपल्याकडे पेट्रोलचे दर 100 रुपये असतात. जे खाद्यतेल ८०-९० रुपयांना मिळायचं ते खाद्यतेल आता २०० रुपयांना मिळतंय, जो स्वयंपाकाचा गॅस ४०० रुपयांना मिळायचा तो आता ८५० रुपयांना मिळतोय, असे रुपाली चाकणकर यांनी म्हटले. तसेच, "बहोत हुई महंगाई की मार" अशा फुशारक्या मारत नरेंद्रजी मोदी सत्तेत आले. मात्र, सत्तेच्या खुर्चीवर बसताच मोदींनी जनहित बाजूला ठेवून केवळ आपल्या उद्योगपती मित्रांच्या हितासाठी काम केल्याचा आरोपही चाकणकर यांनी केला आहे.