Video: पीएमपी बस चालकाची मस्ती; ५० पेक्षा अधिक प्रवाशांचा जीव लावला टांगणीला
By नितीश गोवंडे | Published: October 22, 2023 03:42 PM2023-10-22T15:42:27+5:302023-10-22T15:43:19+5:30
कार चालकासोबत झालेल्या किरकोळ वादानंतर चिडलेल्या बस चालकाने बेदरकारपणे बस रिव्हर्स घेत कारला धडक
पुणे: शहरात पीएमपी बसद्वारे नागरिकांना स्वस्तात परिवहन सुविधा पुरवली जाते. मात्र अनेकदा पीएमपीचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासोबत नागरिकांची वादावादी होत असते. याचे प्रमुख कारण पीएमपीच्या लोकांची दादागिरीची भाषा हे असते. कार चालकासोबत झालेल्या किरकोळ वादानंतर चिडलेल्या पीएमपी बस चालकाने बेदरकारपणे बस रिव्हर्स घेत कारला धडक देण्याच्या नादात बसमधील ५० पेक्षा अधिक प्रवाशांचा जीव टांगणीला लावला. या घटनेमुळे शहरात संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती झाल्याची आठवण पुणेकरांना झाली. ही घटना सेनापटी बापट रस्त्यावरील एका पंचतारांकित हॉटेलजवळ घडली. पीएमपी चालक निलेश ज्ञानेश्वर सावंत (३१, रा. वारजे माळवाडी) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यात मद्यधुंद बसचालकाचा प्रवाशांचा जीवाशी खेळ; विरुद्ध दिशेने बस चालवत वाहनांना धडक#Pune#pmpmlpic.twitter.com/8cxePVHU2c
— Lokmat (@lokmat) October 22, 2023
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीएमपी चालक निलेश सावंत त्याच्या ताब्यातील कोथरूड डेपोची पीएमपी बस घेऊन शनिवारी (२१ ऑक्टोबर) रोजी एनडीए गेट ते सेनापती बापट रस्तामार्गे चिंचवड कडे जात होता. बस दुपारी एकच्या सुमारास एस. बी. रस्त्यावर आलेली असताना एका रुग्णालयाजवळ त्याने वाकडी-तिकडी बस चालवली. त्यामुळे एका कारला घासून ती पुढील चौकात गेली. या घटनेमुळे कारचालक आणि निलेश सावंत यांच्यात वाद झाला. याच कारणावरून चिडलेल्या निलेशने त्याच्या ताब्यातील बस थेट रिव्हर्स घेत बस मागे असलेल्या ३ वाहनांना धडक दिली. त्यानंतर तो बस पुन्हा पुढील चौकापर्यंत घेऊन गेला. चालकाच्या या कृत्यामुळे घाबरलेल्या बसमधील प्रवासी महिला बसमधून वाचवण्यासाठी ओरडत असल्याचे देखील व्हायरल झालेल्या व्हिडिओ मधून दिसून येत आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक संतोष कोळी हे करत आहेत. पीएमपी प्रशासनाने देखील निलेश सावंत याच्यावर तात्काळ कारवाई करत त्याला कामावरून कमी केले असल्याचे सांगितले.