Video: दुकानात जाताना राज ठाकरे पत्रकारांवर भडकले, विचारला एकच सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 10:27 PM2022-05-17T22:27:25+5:302022-05-17T22:31:30+5:30
राज ठाकरे आजपासून दोन दिवस पुणे शहराच्या दौऱ्यावर आहेत. 21 मे ते 28 मे या कालावधीत त्यांची पुण्यात जाहीर सभा होणार आहे
पुणे - मनसेप्रमुखराज ठाकरे गेल्या 2 महिन्यांपासून चांगलेच चर्चेत आहेत. हिंदुत्त्वाची भूमिका, भोंग्याचा वाद आणि अयोध्या दौऱ्यामुळे ते मीडियाचे आकर्षणही ठरत आहेत. स्पष्टवक्ते आणि परखडपणे बोलणारं व्यक्तिमत्त्व म्हणून राज ठाकरेंची ओळख आहे. त्यामुळेच, अनेकदा ते पत्रकारांनाही खडेबोल सुनावतात. आज पुण्यात पुन्हा एकदा त्याचीच झलक पाहण्यास मिळाली. सतत मागावर असणाऱ्या माध्यमांच्या प्रतिनिधींना पाहून राज ठाकरे यांनी वैतागून जगु द्याल की नाही, असा प्रश्न केला. त्यानंतर, माध्यम प्रतिनीधींनी आपले कॅमेरे खाली केले.
राज ठाकरे आजपासून दोन दिवस पुणे शहराच्या दौऱ्यावर आहेत. 21 मे ते 28 मे या कालावधीत त्यांची पुण्यात जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या तयारीसाठी आणि पुण्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधण्यासाठी ते पुणे दौऱ्यावर आहेत. आज सायंकाळी पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधल्यानंतर ते अक्षरधारा या पुस्तकांच्या दुकानाला भेट देण्यासाठी आले होते. आता, राज ठाकरे येणार म्हणजे माध्यमांचे प्रतिनिधी त्याची वाट पहाणार हे नक्की. गाडीतून उतरल्यानंतर माध्यमांना पहाताच राज ठाकरे भडकले. माध्यमांच्या प्रतिनिधींकडे जाऊन ते स्पष्टच बोलले. जगू द्याल की नाही? असा सवालच त्यांनी पत्रकारांना विचारला.
पुणे - जगू द्याल का नाही, राज ठाकरे पत्रकारांवर संतापले pic.twitter.com/qaLs8Tbvxa
— Lokmat (@lokmat) May 17, 2022
दरम्यान, माध्यम प्रतिनिधींशी काहीही न बोलता रागातच राज ठाकरे निघून गेले. अचानक घडलेल्या या घटनेनंतर माध्यमांचे प्रतिनिधी देखील काहीसे गोंधळून गेले. राज ठाकरे हे नेहमीच नवनवीन पुस्तके खरेदी करत असतात. अक्षरधारा हे त्यांचं नेहमीच ठिकाण आहे. दरम्यान, राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची तयारी सुरू असतानाच आता या दौऱ्यापूर्वी पुण्य नगरीत होत असलेल्या सभेचीही तयारी सुरू आहे. त्यामुळे, राज ठाकरें माध्यमांसाठी चर्चेचा विषय आहेत. मात्र, त्यांनी आज पत्रकारांना झिडकारल्याचं दिसून आलं.