Video : सॅल्यूट! पुण्यात वाहतूक पोलीस महिलेने रस्त्यावर झाडू फिरवत दाखविली 'कर्तव्यदक्षता'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2021 09:46 PM2021-01-18T21:46:21+5:302021-01-18T22:04:20+5:30
टिळक रस्ता हा तसा पुणे शहरातील नेहमीच गजबजलेला रस्ता म्हणून परिचित आहे.
पंकज बिबवे -
पुणे : गेल्या काही दिवसांत वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांवर होणारे हल्ले वाढले आहे. विश्रांतवाडीमध्ये नुकतीच एका वाहतूक पोलीसमहिला कर्मचाऱ्याला बेदम मारहाण झाल्याची घटना घडली आहे. ऊन, वारा, पाऊस यामध्ये आपले कर्तव्य एकनिष्ठतेने बजावत असताना खाकी वर्दीतले पोलीस काय किंवा वाहतूक पोलीस कर्मचारी हे कधीच कसूर करत नाही. आजदेखील याचा प्रत्यय पुणे शहरात एका गजबजलेल्या रस्त्यावर आला. आणि 'तो' प्रसंग पाहून येणाऱ्या जाणाऱ्या तोंडून फक्त कौतुक आणि कौतुकच ऐकायला मिळत होते.
टिळक रस्ता हा तसा पुणे शहरातील नेहमीच गजबजलेला रस्ता म्हणून परिचित आहे. सोमवारी सायंकाळी या रस्त्यावर एस. पी कॉलेज चौकात रिक्षा आणि दुचाकीस्वाराची समोरासमोर धडक झाली. सुदैवाने झालेल्या या अपघातात कुणालाही गंभीर दुखापत झाली नाही. परंतु, दुचाकी अणि रिक्षा यांच्या काचा फुटून मोठे नुकसान झाले. यामुळे भर चौकात रस्त्यावर काचांचा खच साचला होता.
पुण्यातील 'या' वाहतूक पोलीस कर्मचारी महिलेनं रस्त्यावर फिरवला झाडू https://t.co/CbvSFUB0GJpic.twitter.com/9BZXD9WLMa
— Lokmat (@MiLOKMAT) January 18, 2021
याचवेळी तेथे खडक वाहतूक विभागाचे एक महिला व एक पुरुष वाहतूक पोलिस वाहतूक नियमन करत होते. अपघात झाल्याचे कळताच त्यांनी वाहतूक तर सुरळीत करून दिली. परंतु याचबरोबर रस्त्यावर साचलेल्या काचांमुळे इतर कोणाचाही अपघात घडू शकतो या भावनेने तिथे असलेल्या खडक वाहतूक विभागातील वाहतूक पोलिस रजिया फैयाज सय्यद यांनी जबाबदारीच्या भावनेतून शेजारीच असलेल्या अमृततुल्यमधील झाडू स्वतः हातात घेऊन रस्त्यावरच्या काचा बाजूला केल्या. या महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या प्रसंगावधानतेमुळे अनेक अपराध रोखले गेले. त्यामुळे चौकातील ये-जा करणारा प्रत्येकजण त्या वाहतूक महिला कौतुक करण्यास विसरला नाही.