Video: पुण्यातील ७५ वर्षीय आजोबा गच्चीवर भरवतात ३० वर्षांपासून पक्षांची 'शाळा'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2020 10:48 AM2020-11-08T10:48:56+5:302020-11-08T11:10:34+5:30
३० वर्षांपासून भरणाऱ्या या शाळेला चाळीसहून अधिक प्रजातीचे पक्षी देतात भेट...
श्रीकिशन काळे -
पुणे : वय वर्षे ७५...तरी गच्चीवर शंभरहून अधिक झाड-रोपं बहरत आहेत. त्यांना रोज पहाटे पाच वाजता उठून ते पाणी घालतात. कारण तिथे चाळीसहून अधिक प्रजातीचे पक्षी भेट देण्यासाठी येतात. पक्ष्यांच्या प्रेमापोटी ती झाडं त्यांनी तशीच ठेवली आहेत, त्याला फळ आले तरी ते पक्ष्यांसाठी ठेवतात, या पक्षीप्रेमीचे नाव आहे नंदू कुलकर्णी.
गेली अनेक वर्षांपासून त्यांनी आपल्या गच्चीवर छानशी बाग फुलवली आहे. दररोज पक्षी येत असल्याने त्यांचा दिवस आनंदात जातो आणि ते फुल, फळ असे झाडं लावून जणूकाही त्या पक्ष्यांचे घरच जोपासत आहेत.
गार्डन एक्सपर्ट नंदू कुलकर्णी हे ‘निसर्ग संवाद’नावाची संस्थाही चालवतात. त्याद्वारे पर्यावरण संवर्धन, पाणी बचत, प्रदूषण कमी करणे आदी विषय शिकवतात पक्ष्यांविषयी त्यांना खूप जिव्हाळा असल्याने एक मोठे मातीचे पाण्याचे पसरट भांडे ठेवले आहे. त्यात अनेक पक्षी येऊन स्नान करतात. एका शिंप्याने त्यांच्याकडील एका छोट्या झाडाच्या पानांमध्ये घरटं बांधले आहे. त्यात पिल्लं मोठी होत आहेत. करवंद, चिकू, डाळिंब अशी फळझाडं मोठ्या कुंडीत बहरत आहेत. तर फुलझाडं देखील आहेत.
पक्ष्यांना अन्नधान्य टाकू नये
आजकाल प्राणी, पक्ष्यांवर प्रेम दाखवण्यासाठी अनेकजण त्यांना खायला घालतात. पण पक्ष्यांचे खाद्य हे ते स्वत: शोधतात. त्यांना आपण सवय लावू नये. काही पक्षी बिया खातात, फळं खातात ते त्यांना मिळते. आपण फक्त त्यांना पाणी द्यावे, इतर धान्य वगैरे टाकू नये, असा सल्ला नंदू कुलकर्णी यांनी दिला.
चाळीस प्रजातीच्या पक्ष्यांची भेट
साळुंकी, दयाळ, टोपीवाला, लाल गाल्या बुलबुल, लालबुड्या बुलबुल, चष्मेवाला, कोतवाल, शिंजीर, शिंपी, राखी वटवट्या, तांबट, हळद्या, वेडा राघू, जांभळा सूर्यपक्षी असे असुमारे ४० प्रकारचे पक्षी या गार्डनमध्ये येतात.