Video: मेंढ्या धावल्या रिंगणी...! गजर हरिनामाचा...! इंदापूरात तुकोबांच्या पालखीभोवती मेंढ्यांचे रिंगण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2023 05:26 PM2023-06-19T17:26:05+5:302023-06-19T17:27:01+5:30
हरिनामाच्या गजरात अन् हजारो भाविकांच्या उपस्थितीत मेंढ्या धावल्या रिंगणी
गजानन हगवणे
काटेवाडी : श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा सोमवारी (दि १८ ) रोजी इंदापूरात तालुक्यात दाखल झाला. काटेवाडी( ता.बारामती) येथे संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील पालखी रथाभोवती वैशिष्ट्यपूर्ण मेंढ्यांचे रिंगण पार पडले. यावेळी हजारो भाविकांनी हा सोहळा पाहण्यासाठी गर्दी केली होती.
संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा मार्गस्थ होत असताना परिसरातील मेंढपाळांनी मेंढ्यांची रोगराई दुर होण्यासाठी पालखी रथाभोवती गोल रिंगण घालून मनोभावें वंदन केले. त्या वेळेपासून ही आगळीवेगळी परंपरा भाविकांनी श्रध्देने जपली आहे. सोमवार( दि.18 )रोजी दुपारी काटेवाडी (ता.बारामती) येथे धोतराच्या पायघडया अंथरूण जगतगुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे उत्साही स्वागत करण्यात आले. दुपारी 3 वाजता संभाजी काळे ,तात्यासो मासाळ ,महादेव काळे ,सुभाष मासाळ, हरि महारनवर, यांच्या मेंढ्यांनी पालखी रथाभोवती पाच प्रदक्षिणा घालुन मेंढ्यांनी रिंगण पुर्ण केले.
संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील रथाभोवती वैशिष्ट्यपूर्ण मेंढ्यांचे रिंगण पार पडले#Pune#santtukarammaharaj#ashadhiwaripic.twitter.com/0bGaIwfAFX
— Lokmat (@lokmat) June 19, 2023
यावेळी उपस्थित भाविकांनी हरिनामाचा गजर केला. या वैशिष्ट्यपूर्ण रिंगणाने भाविकांच्या डोळ्याचे पारणे फेडले. बारामती शहरातून शनिवारी पहाटे प्रस्थान ठेवल्यानंतर पिपंळी, लिमटेक येथील स्वागत सत्कार स्वीकारत पवाराच्या काटेवाडीत विसावला. पालखी स्वागतासाठी परिट समाजातील ननवरे बांधवांच्या वतीने धोतराच्या पायघडया घालण्यात आल्या. गावच्या वेशीतून बॅडपथक, शालेय लेझिमपथक, हरिनामाच्या गजरात मोठ्या उत्साहात ग्रामस्थांनी पालखी खांद्यावरून दर्शन मंडपात नेण्यात आली. या पालखी सोहळ्याचे उद्योजक रणजित पवार, शरयु फौडेशन च्या अध्यक्षा शर्मिला पवार , छत्रपतीचे अध्यक्ष प्रशांत काटे, संरपच विद्याधर काटे उपसंरपच श्रीधर घुले, नियोजन मंडळाचे सदस्य पांडूरग कचरेआदींनी स्वागत केले. पालखी सोहळा दर्शन मंडपात विसावल्यानंतर दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. काटेवाडी येथे पालखी च्या स्वागतासाठी पताका,स्वागत कमानी,लावून परिसराची सजावट केली होती. तर दर्शन मंडप सभागृह फुलांच्या माळांनी सजविले होते.
रिंगण सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी दुतर्फा मोठी गर्दी केली होती. तत्पुर्वी बारामती ट्रेक्स्टाईल पार्क च्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी पालखी दर्शन मंडपात श्री संत तुकाराम महाराज यांची आरती केली व सोहळ्याच्या स्वागताची उणीव राहू नये यासंबधी पाहणी केली. तहसीलदार गणेश शिदे गटविकास अधिकारी अनील बागल, विभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यानी तालुक्याच्या वतीने निरोप दिला. काटेवाडी च्या रिंगण सोहळ्यानंतर इदापूर तालुक्यात भवानीनगर येथे पालखी सोहळ्याचा प्रवेश झाला.