Video: पुण्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा धुमाकूळ; रस्त्यांवर नद्या वाहू लागल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2024 05:26 PM2024-09-25T17:26:04+5:302024-09-25T17:27:04+5:30
पुढील २४ तासांत जिल्ह्यातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह अतिवृष्टी होणार, हवामान विभागाचा अंदाज
पुणे : पुण्यात दुपारपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. विजांचा कडकडाटसह पाऊसपुणेकरांना झोडपून काढत आहे. रस्त्यांवरून अक्षरश नद्या वाहू लागल्या आहेत. सर्व भागात वाहतूककोंडी झाल्याचे चित्र आहे. जनजीवन विस्कळीत झाले असून पुणेकरांची चांगलीच दाणादाण उडाली आहे. पुढील २४ तासांत जिल्ह्यातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीहोण्याबाबतचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे,
पुण्यात गेल्या दोन तीन दिवसांच्या पावसाने धरणे पूर्ण भरली आहेत. धरणातून विसर्गही सुरु करण्यात आला आहे. पुणे शहर, उपनगर आणि ग्रामीण भागामध्ये सध्या पासून पडत आहे. सकाळपासून अंधारून आल्याने सूर्यनारायणाचे दर्शनही पुणेकरांना झाले नाही. जोरदार पावसामुळे शहरातील विविध सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. शिवाजीनगर, एरंडवणा, सिंहगड रस्ता, बाणेर-बालेवाडी, सातारा रस्ता, कात्रज, लष्कर परिसर, हडपसर, कात्रज, लोहगाव विमाननगर अशा सर्वच परिसरांत मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.
पुण्यात पावसाचा धुमाकूळ, रस्त्यांवरून नद्या वाहू लागल्या #PuneRains#River#climatepic.twitter.com/xK6WxYDTkG
— Lokmat (@lokmat) September 25, 2024
मॉन्सून परत जातोय की परत आलाय !
पुण्यामध्ये गेल्या दोन-तीन महिन्यांमध्ये मॉन्सूनचा पाऊस सरासरीहून अधिक पडला आहे. परतीच्या प्रवासाला निघालेल्या पावसाने चांगलाच जोर धरला आहे. त्यामुळे पुणेकर सोशल मीडियावर मॉन्सून परत जातोय की, परत आलाय? यावर विनोद करत आहेत. मॉन्सून आल्यावर ज्या प्रकारचे वातावरण तयार होते, अगदी तशीच स्थिती सध्या निर्माण झाली आहे.
पुणे जिल्ह्यात आज ‘रेड अलर्ट !’
मध्य महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील काही ठिकाणी बुधवारी (दि.२५) जोरदार ते अति जोरदार पावसाचा रेड अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. तसेच नगर आणि नाशिक जिल्ह्यातही काही ठिकाणी अति जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. पुण्यात २५ नंतर दोन दिवस ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे.