Vidhan Sabha 2019 : पुण्यातील इच्छुकांनी सोशल मीडियावर कसली कंबर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 11:33 AM2019-09-30T11:33:37+5:302019-09-30T11:37:42+5:30
सध्या अधिकृत फेसबुक पेज, फॅन क्लब पेजेस आणि व्हॉट्सअॅप मेसेजचा पाऊस..
पुणे : विधानसभा निवडणुकीला अवघा एक महिनाही शिल्लक नसताना इच्छुकांनी प्रत्यक्ष गाठीभेटी घेण्यापेक्षा सोशल मीडियावरून जोरदार तयारी सुरु केली आहे. शहरातील प्रमुख पक्षांनी अजून तरी उमेदवारी घोषित केली नसली तरी इच्छुकांनी मात्र सोशल मीडियावर हॅशटॅग भावी आमदार म्हणत प्रचारास सुरुवात केली आहे.
२०१४ पासून फक्त प्रत्यक्ष भेटून नाही तर सोशल मीडियावर केलेली प्रसिद्धीही महत्त्वाची ठरलेली दिसून आली होती. तो पॅटर्न महापालिका आणि लोकसभा निवडणुकीत कायम राहिला होता. त्यामुळे सर्वच इच्छुक आधीपासूनच तयारीत आहेत. सध्या अधिकृत फेसबुक पेज, फॅन क्लब पेजेस आणि व्हॉट्सअॅप मेसेजचा पाऊस पडत आहे. त्यातही भाजप आणि राष्ट्रवादी पुढे असून तुलनेने शिवसेना आणि काँग्रेस पाठीमागे आहेत. भाजपमध्ये तर इच्छुकांसोबत पक्ष कार्यालयानेही मतदारसंघांच्या निहाय आठ वॉररूम तयार केल्या आहेत तर काँग्रेस भवनमध्येही सोशल मीडिया टीम कामाला लागली आहे.
वैयक्तिक फेसबुक पेजसह कार्यकर्त्यांच्या माध्यमातून चालवले जाणारे फॅन पेजही लोकप्रिय होत आहेत. केलेली विकासकामे, दैनंदिन भेटीगाठी-कार्यक्रम आणि उपक्रमांच्या पोस्ट अधिकृत पेजवर तर कार्यकर्त्यांमध्ये ‘हवा’ करणाºया पोस्ट फॅन पेजवर पाहायला मिळतात. शिवाय प्रदेश कार्यालयाच्या पोस्ट आणि नेत्यांची लाईव्ह भाषणेही शेअर केली
जात आहेत.
............
सोशल मीडियावर आता सकारात्मक प्रचाराला प्राधान्य दिले जात आहे. प्रत्यक्षाहून अधिक उत्कट प्रतिमा करण्याकडे भर दिसतो आहे. सकाळी आणि संध्याकाळी पोस्टचे प्रमाण अधिक असून हाच सोशल मीडियाचा 'पिक अवर' असतो. प्रचाराचा पुढचा टप्पा हा आक्रमक स्वरूपाचा त्याचबरोबर आरोप करणारा आणि त्याला उत्तर देणारा असणारा आहे.- सायली नलवडे, पॉलिटिकल कॅम्पेनर, सहस्रजिथ क्रिएशन.
.........
फेसबुक सजग झाल्याने ‘स्पॉन्सर्स’ पोस्टला मर्यादा
सोशल मीडियावर होणारा अपप्रचार टाळण्यासाठी फेसबुकने लोकसभा निवडणुकीवेळी लागू केलेली नियमावली याही निवडणुकीत लागू आहे. तीन टप्प्यांत केलेल्या व्यक्तीच्या शहानिशानंतर फक्त त्याच व्यक्तीला राजकीय आणि सामाजिक व्यक्तींच्या पोस्ट आणि पेज स्पॉन्सर्ड करता येणार आहे.
.....